बियाणे, खते विक्री करणारी दुकाने सुरु ठेवण्यासाठी नियोजन करा
·
जिल्हाधिकाऱ्यांचे
तहसीलदारांना आदेश
वाशिम, दि. २७ : कोरोना
विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये २५ मार्च २०२० पासून संचारबंदी लागू
करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व खासगी व्यवसाय व आस्थापना बंद करण्याचे आदेश
देण्यात आले आहेत. मात्र, बियाणे व खते या कृषि निविष्ठांचा जीवनावश्यक वस्तू १९५५
अंतर्गत समावेश होतो. तथापि, स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांकडून बियाणे, खते व औषधांची
मागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संचारबंदी काळात आवश्यकतेनुसार बियाणे, खते व
औषधे विक्री करणारी दुकाने सुरु ठेवण्याबाबत नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी
तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.
जिल्ह्यातील
शेतकऱ्यांकडून बियाणे, खते व औषधांची मागणी होण्याची शक्यता असल्याने सर्व
तहसिलदारांनी संबंधित तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी व पंचायत समितीचे कृषि
अधिकारी यांच्याशी चर्चा करून संभाव्य निविष्ठा मागणी लक्षात घेवून बियाणे व खते
दुकाने आवश्यकतेनुसदार सुरु ठेवण्याबाबत नियोजन करावे. या नियोजनाबाबत संबंधित
निविष्ठा विक्री सेवा केंद्रास दुकाने चालू ठेवण्याबाबत कळवावे. आवश्यकतेनुसार
चालू ठेवण्यात येणाऱ्या कृषि सेवा केंद्रांची नावे संबंधित कार्यक्षेत्राच्या
पोलीस प्रशासनाला कळवावीत. जेणे करून शेतकऱ्यांना मागणीनुसार विहित वेळेत निविष्ठा
उपलब्ध करून देणे सोयीचे होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
*****
Comments
Post a Comment