दवाखाने सुरु ठेवा, अन्यथा कठोर भूमिका घेवू - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक



·         आयएमए, निमा संघटनेसोबत बैठक
·         खासगी डॉक्टरांना अडचणी असल्यास प्रशासन मदतीसाठी तयार
वाशिम, दि. २६ : जिल्ह्यातील खासगी दवाखाने बंद असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून सद्यस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने नियमितपणे सुरु ठेवावेत. अन्यथा जिल्हा प्रशासनाला नाईलाजने कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज, २६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयएमएनिमासंघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी (महसूल) रमेश काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, ‘आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल कावरखे, सचिव डॉ. अमित गंडागुळे, ‘निमाचे सचिव डॉ. राजेश चौधरी यांच्यासह दोन्ही संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवल्याने ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय व गैरसमज होत आहे. किरकोळ आजार, दुखण्यावर सुध्दा त्यांना उपचार घेण्यासाठी प्रवास करून शासकीय रुग्णालयात यावे लागत आहे. त्यामुळे शासकीय आरोग्य सेवेवरील ताण वाढला आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण शासकीय आरोग्य यंत्रणा काम करीत असताना जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय होवू नये, यासाठी सर्व खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने पूर्ववत सुरु ठेवावेत. दवाखाने सुरु ठेवण्यासाठी काही अडचणी येत असतील तर जिल्हा प्रशासन त्यामध्ये समन्वय साधून मार्ग काढेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
खासगी दवाखान्यात तसेच औषधी दुकानात काम करणारा कर्मचारी वर्ग, महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील आरोग्य मित्र यांनी सुध्दा नियमितपणे कामावर हजर राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी दिल्या. तसेच या लोकांना कामावर येतांना कोणतीही अडचण येवू नये, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश