दिव्यांग व्यक्तींना सन्मानाची वागणूक द्या - पालकमंत्री संजय राठोड






·        वाशिम येथे दिव्यांग मार्गदर्शक मेळावा
वाशिम, दि. १३ : दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या शारीरिक व्यंगावर मात करून स्वावलंबी होण्यासाठी शासनामार्फत विविध योजनांचा लाभ देवून मदत केली जात आहे. त्याचबरोबर त्यांना समाजाकडूनही त्यांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे समाजातील व प्रशासनातील प्रत्येक घटकाने दिव्यांग बांधवांना सन्मानाची वागणूक देवून त्यांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. जुनी जिल्हा परिषद येथील जिजाऊ सभागृहात जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने आज आयोजित दिव्यांग मार्गदर्शक मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीच्या सभापती पानुताई जाधव, कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती विश्वनाथ सानप, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर, दिलीप देशमुख, गजानन अमदाबादकर, दिलीप जाधव, मनीष डांगे, शांताराम फुले, किसनराव मस्के यांची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री श्री. राठोड यांच्या हस्ते दिव्यांग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेच्या लाभार्थ्यांना २० हजार रुपयांचा धनादेश व बचतपत्र प्रदान करण्यात आले.
पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने आयोजित केलेल्या दिव्यांग मार्गदर्शक मेळाव्याच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना शासनामार्फत त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती मिळण्यास मदत होईल. त्यामुळे त्यांना या योजनांचा लाभ घेणे सोपे होणार असून सर्व संबंधित यंत्रणांनी दिव्यांग बांधवांना या योजनांचा लाभ देण्यासाठी तत्पर रहावे. या योजनांचा लाभ घेणे, हा त्यांचा हक्क असून त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. दिव्यांग बांधवांनी सर्व योजनांची सविस्तर माहिती घ्यावी, तसेच या योजनेचा लाभ घेऊन स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करावा. दिव्यांग बांधवांच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. मीना म्हणाले, दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या योजनांची प्रभावीअंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद तत्पर आहे. जिल्हा परिषदेच्या स्व-उत्पन्नातील दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला ४७ लक्ष रुपये निधी १०० टक्के खर्च करण्यात आला असून सुमारे ३०० दिव्यांग बांधवांना घरकुल, तसेच १७० बचत गटांना फिरते भांडवल उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दिव्यांग व्यक्तींच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाचे प्राधान्य असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
प्रास्ताविकात श्री. खमीतकर म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणारा हा पहिलाच दिव्यांग मार्गदर्शक मेळावा आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव असलेला निधी १०० टक्के खर्च करणारी वाशिम जिल्हा परिषद ही विभागातील एकमेव जिल्हा परिषद आहे.
शासनाच्या विविध विभागांमार्फत दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी कार्यक्रमस्थळी विविध शासकीय विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभांगी दामले यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश