विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना महोत्सवामुळे चालना - पालकमंत्री संजय राठोड




चाचा नेहरु बाल महोत्सव
वाशिम, दि. 13 : विद्यार्थ्यांसाठी चाचा नेहरु बाल महोत्सव हा आनंदोत्सव आहे. सळसळत्या उर्जेला प्रवाही करण्याचे काम यामधून होत आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी बाल महोत्सव उपयुक्त आहे असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
13 डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुलातील सभागृहात महिला बालकल्याण विभागाच्या वतीने आयोजित चाचा नेहरु बाल महोत्सवाचे उदघाटन पालकमंत्री श्री. राठोड यांनी केले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष जयश्री गुट्टे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, जिल्हा परिषद सदस्य शालीक राठोड, भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांची उपस्थिती होती.
श्री. राठोड बोलतांना पुढे म्हणाले, अशा प्रकारच्या उत्सवामधून विद्यार्थ्यांना सांघीक भावनेसह बंधूभावाचे धडे मिळण्यास मदत होते. विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते घट्ट होते. विद्यार्थ्यांच्या उज्जवल भविष्याचा पाया शाळेत घातला जातो. विद्यार्थी दशेपासूनच आई वडील, मोठयांचा आदर आणि शिक्षकांचा सन्मान विद्यार्थ्यांनी राखला पाहिजे. मुले आज टि.व्ही आणि मोबाईलच्या विश्वात हरविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
    प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पंडित नेहरु यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. चिमुकल्या बालकांनी मान्यवरांचे सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हयातील शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल असलेली अनाथ,निराधार, उन्मार्गी तसेच शहरातील अन्य शाळेतील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
    महोत्सवाचे प्रास्ताविक जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी केले. संचालन राहुल गवई यांनी तर उपस्थितांचे आभार जिल्हा परिविक्षा अधिकारी गजानन जुमळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी महिला बाल कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे अधिक्षक आणि स्थानिक शाळांच्या शिक्षकानी परिश्रम घेतले.  

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश