रोजगार व मार्गदर्शन मेळाव्यात ६१० उमेदवारांची प्राथमिक निवड




युवावर्गाने कौशल्य विकसित करावी – खा. भावना गवळी
वाशिम, दि. १९ : आज बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. नोकऱ्या ह्या मर्यादित स्वरूपाच्या आहे. युवावर्गाने केवळ नोकरीच्या मागे न लागता विविध प्रकारचे प्रशिक्षण घेवून कौशल्य विकसित करावीत. त्यामुळे स्वावलंबनासोबतच रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध असतील, असे प्रतिपादन खासदार भावना गवळी यांनी केले.
रविवारी वाशिम येथील विठ्ठलवाडी सभागृहात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि नगर परिषद वाशिमच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्तवतीने आयोजित पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळाव्याच्या उद्घाटक म्हणून खा. गवळी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा हे होते. प्रमुख अतिथी म्हणून रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालक सुनंदा बजाज, नगर परिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले यांची उपस्थिती होती.
खा. गवळी म्हणाल्या, आजचे युग हे स्पर्धेचे आहे. या युगात आपल्याला स्पर्धेत टिकायचे असेल तर कठोर मेहनत घ्यावी लागेल. कौशल्य आत्मसात करावी लागेल. रोजगारासाठी गाव सोडून इतरत्र जाण्याची तयारी असली पाहिजे. ज्या कंपन्या या मेळाव्यातून उमेदवारांची निवड करेल त्यांनी कंपनीत रुजू झाले पाहिजे. कंपनीतून येणाऱ्या अनुभवातून भविष्यात इतर मोठ्या व नामांकित कंपन्यांमध्ये जाण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
रोजगार व उद्योजकता कौशल्य विकास मेळाव्यात १८०० उमेदवारांनी नोंदणी केली. उपस्थित उमेदवारांपैकी ६१० उमेदवारांची प्राथमिक निवड रोजगारासाठी उपस्थित १३ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मुलाखत घेवून कली.
या मेळाव्याला हैद्राबाद येथील एस.आय.एस. इंडिया प्रा.लि., जळगाव येथील नवकिसान बायो-प्लाटेक प्रा.लि., यशस्वी ग्रुप नागपूर, फॅब्झ इन्फो प्रा.लि. पुणे, औरंगाबाद येथील हिंदुस्थान कंपोजिटस, नवभारत फर्टिलायझर्स, औरंगाबाद, अमरावती येथील पिपल ट्री व्हेंचर्स प्रा. लि., राजमाता जिजाऊ कन्सल्टंन्सी हिंग्ली, मल्टीपेपर्स वाशिम, सिक्युरा हॉस्पिटल वाशिम, जीवन विमा कार्यालय वाशिम, धूत ट्रान्समिशन लि. आदी कंपन्यांनी आपला सहभाग नोंदविला. मेळाव्यात कौशल्य प्रशिक्षण माहिती, अण्णासाहेब पाटील मागास विकास महामंडळ आणि जिल्हा माहिती कार्यालयाचा लोकराज्य स्टॉल लावण्यात आले होते.
मेळाव्यात शासकीय तंत्र निकेतन प्रा. डोंगरे, प्रा. बिलोलीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालक सुनंदा बजाज यांनी केले. संचालन प्रा. बिलोलीकर यांनी तर उपस्थितांचे आभार श्री. भोळसे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश