घाबरू नका, गोवर-रुबेला लसीकरण पूर्णपणे सुरक्षित !



·         लसीकरणाला येण्यापूर्वी मुलांना पोटभर खाऊ घाला
·         मुलांच्या आरोग्यासाठी लसीकरण आवश्यक
वाशिम, दि. १३ : गोवर-रुबेला लसीकरण पूर्णतः सुरक्षित असून पालकांनी घाबरून न जाता आपल्या मुलांना लसीकरण करावे. लसीकरणासाठी येताना मुलांना पोटभर खाऊ घालावे व नंतरच लसीकरण करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. पुरुषोत्तम कुमार, युनिसेफचे प्रतिनिधी डॉ. महात्मे, निवासी शल्य चिकित्सक डॉ. हेडाउ, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. मेहकरकरअ आदी उपस्थित होते.
डॉ. आहेर म्हणाले, गोवर-रुबेला लसीकरण मोहीम ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी अत्यावश्यक आहे. अशीच मोहिम इतर राज्यांमध्येही यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या मुलांना लस टोचून लसीकरण मोहिमेला सहकार्य करावे. लसीकरणानंतर काही मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे संदेश सोशल मिडीयावर फिरत आहेत. तो पूर्णतः चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सोनटक्के म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे १ लाख ४३ हजार ९१७ बालकांना लसीकरण करण्यात आले आहे. यापैकी अतिशय अत्यल्प मुलांना किरकोळ ताप येणे, त्वचेवर पुरळ उठणे, मळमळल्यासारखे वाटल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. त्यांना १ ते २ तास देखरेखीखाली ठेवून परत घरी पाठविले जात आहे. लसीकरणाचे त्यांच्यावर इतर कोणतेही गंभीर दुष्परिणाम जाणवलेले नाहीत. त्यामुळे पालकांनी अजिबात घाबरून जावू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
‘त्या’ विद्यार्थिनीच्या मृत्यूशी लसीकरणाचा संबंध नाही
            ११ डिसेंबर रोजी वाशिम येथील पल्लवी कृष्णा इंगोले या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून हा मृत्यू गोवर-रुबेला लसीकरणामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार हा मृत्यू पॅराटॉयटीस या लसिका ग्रंथींची सूज येवून मेंदूदाहमुळे होवून झाला आहे. या विद्यार्थिनीला २७ नोव्हेंबर रोजी लसीकरण करण्यात आले होते. त्यानंतर ५ डिसेंबरपर्यंत ती निरोगी होती, असे तिच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्यामुळे गोवर-रुबेला लसीकरणामुळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला नसल्याचे डॉ. आहेर व डॉ. सोनटक्के यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश