अल्पसंख्यांकांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा - हाजी अरफात शेख


वाशिम, दि. 11 : अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आहेत. संबंधित यंत्रणांनी अल्पसंख्यांकांच्या कल्याणकारी योजनांची लाभार्थ्यांना माहिती देवून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देवून त्यांचा विकास साधावा. असे निर्देश राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आज अल्पसंख्यांक समाजासाठी असलेल्या पंधरा कलमी कार्यक्रमाचा आढावा घेतांना हाजी शेख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक कुमार मीना यांची प्रमुख उपस्थिती होती.

 श्री. शेख म्हणाले, जिल्हयातील अल्पसंख्यांक समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न प्रशासनाने सोडवावा. जिल्हयातील मुस्लीम बांधवांच्या विविध समस्येककडे देखील प्रशासनाने लक्ष दयावे. समाज माध्यमातून एखादया समाजाची बदनामी होत असेल आणि यामधून जातीय तेढ निर्माण झाली तर पोलीसांनी वेळीच दखल घेवून संबंधितावर कारवाई करावी. विविध यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अल्पसंख्यांकासाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करावी असे सांगितले.

जिल्हयातील ऊर्दू शिक्षण देत असलेल्या शाळांच्या दुरुस्तीच्या दृष्टिने शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा.  अल्पसंख्यांक समाजातील मुले-मुली चांगले शिक्षण घेवून मोठया पदापर्यंत गेले पाहिजे असे सांगून श्री. शेख म्हणाले जिथे समस्या आहेत त्यांची सोडवणूक करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील आणि अल्पसंख्यांकांना यातून न्याय मिळवून देण्यात येईल असे सांगितले.

जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी रोजगारासाठी कर्जाची मागणी केली आहे परंतू अद्याप ही कर्ज प्रकरणे बँकांनी मंजूर केली नाही. याचा लवकरच आढावा घेण्यात येईल. कर्ज प्रकरणातील त्रृटी दूर करुन संबंधित लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे मंजूर करण्याबाबत बँकांना कळविण्यात येईल. तसेच अल्पसंख्यांकांच्या विविध समस्यांची सोडवणूकीसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे श्री मिश्रा म्हणाले.

 जिल्हयातील ज्या अल्पसंख्यांक शाळांना ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे तो निधी त्याच प्रयोजनासाठी खर्च झाल्याची खात्री करावी. अंगणवाडयांची बांधकामे ज्या कंत्राटदारांनी सुरु केली नाही त्यांना कारणे दाखवा नोटीस द्यावी. अन्यथा संबंधित कंत्राटदारांवर कारवाईची शिफारस करण्याचे निर्देशही श्री. मिश्रा यांनी दिले.

जिल्हयातील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधीत वाढ व्हावी यासाठी कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यातील शाळांमध्ये अतिरिक्त वर्ग खोल्या, स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा कक्ष आणि अंगणवाडयाचे बांधकाम करण्यासाठी 9 कोटी 55 लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकिय मान्यता मिळाली असून 4 कोटी 77 लक्ष रुपये निधी या कामांवर खर्च झाला आहे. उर्वरित निधीची मागणी शासनाकडे केल्याचे शिक्षणाधिकारी श्री. मानकर व उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मोहुर्ले यांनी संगितले.

 केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाच्या बहुक्षेत्रिय विकास कार्यक्रमांतर्गत गठीत शक्ती प्रदत्त समितीने कारंजा, मानोरा आणि मालेगांव येथे मुलींसाठी प्रत्येकी एक वस्तीगृह बांधकामासाठी मान्यता दिली असून 4 कोटी 65 लक्ष रुपये निधी प्राप्त झाल्याचे श्री. मानकर यांनी सांगीतले. डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2017-18 या वर्षात तीन कामांसाठी 11 लक्ष 40 हजार रुपये निधी शासनाकडून मंजूर करुन संबंधित मदरसांना वितरीत करण्यात आला आहे. तर चालु वर्षात 9 प्रस्ताव प्राप्त झाले असून मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आले आहे. पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाकरीता जाहिरात देण्यात आली असून प्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागवून प्रशिक्षणासाठी 92 उमेदवारांची निवड करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने यावेळी दिली.

ग्रामीण भागात अल्पसंख्यांक समाजाची वस्ती असलेल्या गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत स्तरावरचे 10 लाख रुपये मर्यादेचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याचे श्री. माने यांनी यावेळी सांगितले. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत 538 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत असून आतापर्यंत 138 जणांनी प्रशिक्षण घेतले आहे. कौशल्य विकासातून स्वयंरोजगाराच्या दृष्टिने चार मेळाव्याचे उदिष्ट देण्यात आले असून मेळाव्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती बजाज यांनी दिली.  

 आढावा बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, नितीन माने, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर व तानाजी नरळे, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्या सुनंदा बजाज,  वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले, तंत्रनिकेतन विद्यालयाचे प्रा. डोंगरे तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश