कारागीर गजाननला मिळाली ‘मुद्रा’ची साथ
बेरोजगारीचे प्रमाण ऐकीकडे वाढत असतांना याच बेरोजगारांना स्वावलंबी
करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना महत्वपुर्ण ठरली आहे. गजानन उगले हा अर्धकुशल
कारागीर पार्डी टकमोरसारख्या छोट्या गावात आज स्वावलंबी झाल्याचे चित्र आहे.
वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर हे छोटेसे गाव.
गावात गजानन उगले नावाचा 12 वी नापास असलेला युवक. पण स्वावलंबनासाठी त्याने वाशिम
येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयातून सन 2001-2002 या वर्षी 6 महिने कालावधीचे दुचाकी
वाहन दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणानंतर गजाननने वाशिम येथे टू-व्हिलर दुरुस्तीच्या
एका दुकानात जवळपास 10 वर्ष मॅकेनिकल म्हणून काम केले. यातून त्याला महिन्याकाठी 6
ते 7 हजार रुपये मिळायचे. दुसऱ्याच्या दुकानात नोकर म्हणून गजाननने काम करायचा. वाशिमवरुन
17 कि.मी. अंतरावर असलेल्या पार्डीवरुन तो ये-जा करायचा. आपण सुध्दा आता स्वबळावर उभे
राहीले पाहिजे हा विचार गजाननच्या मनात आला. गावातच हा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय
त्यांनी घेतला.
एकदा टि.व्ही वरुन प्रधानमंत्री मुद्रा योजनेची
जाहिरात गजाननने बघितली आणि दुसऱ्याच दिवशी गावात असलेल्या विदर्भ-कोकण ग्रामीण बँकेचे
शाखा व्यवस्थापक भिमराव राऊत यांची भेट घेवून मुद्रा बँक योजनेबाबतची माहिती त्यांनी
जाणून घेतली. गजानन हा चांगल्या प्रकारे दुचाकी वाहने दुरुस्तीचे कामे करतो हे शाखा
व्यवस्थापकांना माहित होते. त्यामुळे शाखा व्यवस्थापक श्री. राऊत यांनी गजानन उगलेला
ऑक्टोबर 2016 मध्ये दुचाकी वाहने दुरुस्तीचे दुकान सुरु करण्यासाठी ‘मुद्रा’च्या शिशू
गटातून 25 हजार रुपये दिले. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी गजाननने ग्रामपंचायतीच्या मालकीचे
दुकान अनामत रक्कम देवून भाडयाने घेतले. मुद्रा योजनेतून मिळालेल्या 25 हजार रुपयांमधून
गजाननने दुचाकी वाहनाची दुरुस्ती करण्यासाठी लागणारे पाने, पेंचीस, 3 हजार रुपयांचे
छोटे स्पेअर पार्ट, वाहनातील इंजीनसाठी लागणारे ऑईल खरेदी केले.
यातून गजाननने पारेश्वर हिरो होंडा सर्व्हिस सेंटर या दुचाकी वाहनाच्या
दुरुस्तीच्या व्यवासायाला गावातच सुरुवात केली. नवीन व्यवसायाची सुरुवात केल्यामुळे
सुरुवातीला 300 रुपये तो कमवायचा. शेजारच्या तांदळी, शेवई,
जनोना, इचोरी, बिठोडा,
पांडवउमरा, जांभरुन आणि गावातील लोक दुचाकी वाहने
दुरुस्तीसाठी गजाननच्या दुकानात घेवून येवू लागले. शिशू गटातून मिळालेल्या 25 हजार
रुपयांची परतफेड देखील त्याने एका वर्षाच्या आत केली.
गजाननचा हा व्यवसाय आता चांगला जम बसवू लागला.
त्याने डिसेंबर 2017 मध्ये विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखेतून पुन्हा 50 हजार रुपये शिशू
गटातून कर्ज घेतले. यामधून त्याने दुचाकी वाहने दुरुस्तीसाठी लागणारे सुटे भाग, दुकानासाठी लागणारे फर्नीचर, आलमारी, इंजिन ऑईल खरेदी केले. शेजारच्या गावातून दररोज
काही लोक दुचाकी दुरुस्तीसाठी घेवून येऊ लागले. आज त्याला या व्यवसायातून प्रतिदिवस
600 रुपये नफा मिळत आहे. या व्यवसायात गजाननला मुद्रा योजनेची चांगली साथ मिळाल्यामुळे
तो स्वावलंबी झाला आहे. दुचाकी वाहनांचे सुटे
भाग घेवून आता कंपनीचे प्रतिनिधी गजाननच्या दुकानात येत असल्यामुळे त्याला सुटया भागाच्या
खरेदीसाठी बाहेर जाण्याची आवश्यकताच नाही.
आता दुचाकी वाहने धुण्यासाठी वॉटर सर्व्हीसींगची मशीन आणण्याचा विचार असल्याचे गजाननने
सांगितले. महिन्याकाठी 300 रुपये दुकान भाडे तो ग्रामपंचायतीला देतो. प्रधानमंत्री
मुद्रा योजनेतून गजाननला पार्डी टकमोर येथील विदर्भ-कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेने दोनदा
कर्ज उपलब्ध करुन दिले. बँक आपल्याला व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत करेल यावर त्याचा
विश्वास नव्हता. मात्र प्रधानमंत्र्यांची महत्वाकांक्षी असलेल्या प्रधानमंत्री मुद्रा
योजनेतून स्वबळावर उभे राहण्याचे गजाननचे स्वप्न पुर्ण झाले.
Comments
Post a Comment