ग्रंथ वाचनामुळे माणूस घडतो - धोंडूजा इंगोले
·
विविध ग्रंथ एकाच
ठिकाणी खरेदी करण्याची संधी
वाशिम, दि. २२ : जीवनात ग्रंथ महत्वाची
भूमिका बजावू शकतात. ग्रंथ वाचनामुळे माणूस ज्ञानसमृद्ध होतो. त्याची माणूस म्हणून
जडणघडण होते. त्यामुळे प्रत्येकाने ग्रंथ वाचनाची आवड जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन
सुप्रसिद्ध साहित्यिक धोंडूजा इंगोले यांनी केले. जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा
ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित ‘वत्सगुल्म ग्रंथोत्सव २०१९’च्या
उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी
विवेक खडसे हे होते.
यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्र. म. राठोड, जिल्हा ग्रंथालय संघाचे
अध्यक्ष रमेश काळे, प्रमुख कार्यवाह प्रभाकर घुगे, डॉ. सीताराम नालेगावकर यांची
उपस्थिती होती.
श्री. इंगोले म्हणाले, ग्रंथ हा उत्तम गुरु असतो. ग्रंथ वाचनामुळे आपल्याला वेगवेगळ्या
विषयांमधील ज्ञान संपादन करणे शक्य होते. कोणत्याही प्रकारचा ग्रंथ हा आपल्या
अनुभवात नवीन भर टाकत असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ग्रंथ वाचनाची आवड
जोपासली पाहिजे. ग्रंथ वाचनामुळे माणूस समाजशील होतो. वैचारिक बनतो. त्यामुळे
सामाजिक बंधुता, एकोपा निर्माण होण्यासाठी ग्रंथवाचन फायदेशीर ठरणारे आहे. विद्यार्थी
व शिक्षकांनी सुद्धा अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर अवांतर ग्रंथाचे वाचन करण्याची आवड
जोपासण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा माहिती अधिकारी श्री. खडसे म्हणाले, आज विविध कारणांनी वाचनाची आवड
कमी झाली आहे. त्यामुळे वाचक चळवळ वृद्धींगत होण्यासाठी राज्य शासनामार्फत
जिल्हास्तरावर ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यार्थी दशेपासूनच वाचनाची
आवड निर्माण झाली तर व्यक्तिमत्व विकास होऊन जीवनाला दिशा मिळते. तसेच देशाचा सजग,
चांगला नागरिक घडण्यास मदत होते. वाचनाची आवड जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअरची
निवड करताना सुद्धा जास्त संघर्ष करावा लागत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये
वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकांसोबतच पालकांनीही विशेष जागरूक राहिले
पाहिजे.
ग्रामीण भागात वाचन चळवळ वाढण्यासाठी गावोगावी स्थापन झालेल्या वाचनालयांनी
पुढाकार घेण्याचे आवाहन करून त्यांनी राज्य शासनामार्फत प्रकाशित करण्यात येणाऱ्या
‘लोकराज्य’ मासिकाविषयी माहिती देवून या मासिकाची उपयुक्तता सांगितली.
श्री. घुगे म्हणाले, ग्रंथोत्सव हा वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी उपयुक्त
ठरतो. त्याचप्रमाणे यावेळी आयोजित केल्या जाणाऱ्या ग्रंथ प्रदर्शनीमुळे विविध प्रकारचे
ग्रंथ एकाच ठिकाणी खरेदी करण्याची संधी ग्रंथप्रेमींना उपलब्ध होते. ग्रंथोत्सवास
भेट देणाऱ्या प्रत्येकाने याठिकाणी लावण्यात आलेल्या ग्रंथ दालनांमधून किमान एक
तरी ग्रंथ खरेदी करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविकात श्री. राठोड यांनी ग्रंथोत्सव आयोजनाची भूमिका विशद केली. तळागाळातील
लोकांपर्यंत ग्रंथ व ग्रंथ वाचनाचे महत्त्व पोहोचविण्यासाठी हा ग्रंथोत्सव आयोजित
केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल बळी यांनी केले
तर उपस्थितांचे आभार डॉ. सीताराम नालेगावकर यांनी मानले.
ग्रंथदालनाचे उद्घाटन
ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने उभारण्यात
आलेल्या ग्रंथ दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. नागपूर
येथील शासकीय ग्रंथ भांडाराच्या दलानासह इतर नामांकित प्रकाशन संस्थांचे व
विक्रेत्यांनी आपली दालने याठिकाणी उभारली आहेत. त्यामुळे ग्रंथप्रेमींना एकाच
छताखाली विविध ग्रंथ खरेदी करण्याची संधी प्राप्त झाली आहे. ग्रंथ प्रदर्शनीचा आज
शेवटचा दिवस आहे.
ग्रंथदिंडीद्वारे ग्रंथ वाचनाविषयी
जनजागृती
ग्रंथोत्सवानिमित्त वाचनाविषयी जनजागृती
करण्यासाठी आज राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालय येथून जिल्हा क्रीडा संकुलपर्यंत
ग्रंथदिंडी काढण्यात आली. माजी आमदार विजयराव जाधव यांच्या हस्ते ग्रंथपूजन करून ग्रंथदिंडीला
प्रारंभ झाला. लोककलावंत, ग्रंथप्रेमी नागरिक, जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी व
विद्यार्थी या ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते.
ग्रंथोत्सवाचा आज समारोप
‘वत्सगुल्म
ग्रंथोत्सव २०१९’ मध्ये आज, २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शालेय विद्यार्थ्यांचा
शैक्षणिक कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता ‘ग्रंथ वाचन आणि विकास’ या
विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे
यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेचे शिक्षक
मोहन शिरसाट, जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेखाधिकारी शेख युसुफ
सहभागी होतील. दुपारी ३ वाजता ‘वाह वाह क्या बात’ फेम हास्यकवी मनोज मद्रासी यांच्या
अध्यक्षतेखाली काव्य वाचन कार्यक्रम होईल. यामध्ये प्रा. फारुख जमन व डॉ. विजय
काळे सहभागी होतील. सायंकाळी ४ वाजता ग्रंथोत्सव समारोपीय कार्यक्रम होणार आहे.
******
Comments
Post a Comment