अपघाताला आळा घालण्यासाठी अतिक्रमणे हटविण्यासोबतच नियमांची अंमलबजावणी करा - लक्ष्मीनारायण मिश्रा

·         जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक
वाशिम, दि. १८ : जिल्ह्यात शहरी भागात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात असलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. ही अतिक्रमणे हटविण्यासाठी संबंधित नगरपालिका, नगरपंचायतीने तातडीने कार्यवाही करावी. अपघातावर आळा घालण्यासाठी अतिक्रमणे हटविण्यासोबतच वाहतूक नियमांचा वाहन चालकांकडून भंग होणार नाही, यासाठी वाहतूक नियमांची पोलीस आणि परिवहन विभागाने कठोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले.
१७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत श्री. मिश्रा बोलत होते. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक तानाजी नरळे, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बी. आर. राठोड, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विनायक जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंता निलेश नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. मिश्रा म्हणाले, अपघात प्रवण असलेल्या ब्लॅकस्पॉटबाबत येत्या ३१ डिसेंबरपर्यंत उपाययोजना कराव्यात. राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीने प्रवास करणाऱ्या वाहनचालकास हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक करावे. रस्त्यांवरील असलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे हे खड्डे बुजविण्याचे काम संबंधित विभागांनी तातडीने हाती घ्यावे. अल्पवयीन बालके शाळेत अथवा शिकवणीला दुचाकी वाहनाने जात असतील तर अशा बालकांच्या पालकांवर दंड आकारावा व यापुढे ही बालके दुचाकीचा वापर करणार नाहीत, असे त्यांच्याकडून लेखी घ्यावे. त्यामुळे अपघाताला आळा बसण्यास मदत होईल. वाहनांच्या नियमित तपासण्या करण्यात याव्यात. नियम तोडणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्रीमती दुतोंडे यावेळी म्हणाल्या, वाशिम-मालेगाव मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. हे खड्डे तातडीने बुजविण्याची कार्यवाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने करण्यात यावी. अपघात प्रवण ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने सूचना फलक लावावेत. दारू पिऊन वाहन चालविले तर सहा महिने वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्याची तरतूद असून जिल्ह्यात अशा प्रकारे वाहन चालविताना आढळल्यास वाहन चालकाविरुद्ध कारवाई करण्यात येईल. चारचाकी वाहन चालकाने सीट बेल्टचा उपयोग केला नाही तर त्यांच्या विरुद्ध देखील कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
नवीन वाहनाचे नूतनीकरण करताना आता १ जानेवारीपासून हेल्मेट खरेदी करणे व त्याचा नियमित वापर करणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचे सांगून हेल्मेटचा वापर न करणाऱ्यावर, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्यावर तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. एप्रिल ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान वाहनधारकांकडून १३ लाख रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आल्याचे श्रीमती दुतोंडे यांनी यावेळी सांगितले.
अपघातस्थळी अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, यासाठी १०८ आणि १०३ क्रमांकाच्या अॅम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध असून अपघातस्थळी ही अॅम्ब्युलन्स वीस मिनिटाच्या आत पोहचत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने संबंधित अधिकाऱ्याने दिली. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात येईल. त्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी लोक पुढे येतील, असे त्यांनी सांगितले.
पोलीस विभाग व परिवहन विभागाची
१९ ते ३१ डिसेंबर दरम्यान विशेष तपासणी मोहीम
जिल्ह्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या अनुषंगाने पोलीस विभाग आणि परिवहन विभागाच्यावतीने १९ ते ३१ डिसेंबर दरम्यान विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये हेल्मेटचा वापर न करणे, शीट बेल्टचा वापर न करणे, अल्पवयीन वाहन चालकांविरुद्ध कारवाई करणे, ट्रिपलशीट वाहन चालविणे, वाहन विमा प्रमाणपत्र नसणे, वायू प्रदूषण प्रमाणपत्र नसणे, विना परवाना वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, अंमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालविणे, कर्कश हॉर्नचा वापर करणे, विनानोंदणी वाहन चालविणे, ओव्हरलोडिंग वाहन चालविणे, योग्यता प्रमाणपत्राशिवाय वाहन चालविणे आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करणे यासह अन्य मोटार वाहन कायद्यांतर्गत करण्यात येणाऱ्या गुन्ह्यांबाबत कारवाई करण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी कळविले आहे.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश