वाशिम येथे १६ डिसेंबर रोजी रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळावा
वाशिम, दि. ३० : जिल्ह्यातील
सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना
नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र आणि वाशिम नगरपरिषद (राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान) यांच्या
संयुक्त विद्यमाने रविवार, १६ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १० वाजता
वाशिम येथील विठ्ठलवाडी सभागृहात रोजगार व कौशल्य विकास मेळाव्याचे आयोजन
करण्यात आले आहे. तरी सुशिक्षित बेरोजगार तसेच नोकरी इच्छुक युवकांनी या
मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालक श्रीमती सुनंदा बजाज यांनी केले आहे.
रोजगार मेळाव्यामध्ये औरंगाबाद येथील फॅब्झ
इन्फो प्रा. लि., पुणे येथील स्काडा टेक सोल्युशन प्रा.लि., मुंबई, अमरावती येथील
पिपल ट्री व्हेंचर्स प्रा. लि., रांजणगाव पुणे येथील ब्रिटानिया प्रा.लि., हैद्राबाद
(तेलंगणा) येथील एस. आय. एस. इंडिया लि., पैठण औरंगाबाद येथील हिंदुस्थान
कंपोजिंटस लि., जळगाव येथील नवकिसान बायो-प्लांटेक प्रा. लि., चाकण पुणे येथील एस्सेम
प्रा. लि., आदी उद्योजक सहभागी होणार आहेत. याशिवाय विविध स्थानिक उद्योग सुध्दा
रोजगार देण्यासाठी सहभागी होत आहेत.
इयत्ता १० वी उत्तीर्ण-अनुत्तीर्ण, १२ वी, कौशल्य
विकास प्रशिक्षित (सर्व ट्रेड), आय. टी. आय. (सर्व ट्रेड), एम. सी. व्ही. सी.,
पदवीधर (कला, वाणिज्य, विज्ञान), बी. ई., बी. टेक., पदव्युत्तर पदवी इ. शैक्षणिक
पात्रता असलेले किमान १८ ते ४० वर्षे वयोगटातील महिला व पुरुष उमेदवार या
मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. या मेळाव्यात जिल्हा समन्वयक, कॉम्प्युटर ऑपरेटर,
एमआयएस समन्वयक, ट्रेनी, जॉब ट्रेनी ऑपरेटर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, ट्रेनी
इंजिनीअर, सिक्युरिटी गार्ड, सुपरवायझर, हेल्पर इत्यादी प्रकारचे १५०७ पेक्षा जास्त
रिक्त पदांवर त्याच दिवशी मुलाखत व व तत्सम प्रक्रीयाद्वारे निवड करण्यात येणार
आहे.
तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक पात्रतेची
मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या सत्यप्रती, नुकतीच
काढलेली दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, सेवायोजन
कार्डसह १६ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १० वाजता रोजगार मेळाव्यास
स्वखर्चाने उपस्थित रहावे. सेवायोजन कार्ड नसल्यास www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरून ऑनलाईन प्राप्त करून घ्यावे. याबाबत कोणताही खर्च जिल्हा
कौशल्य विकास, रोजगार व
उद्योजकता कार्यालयाकडून देण्यात येणार नाही. अधिक माहितीसाठी ०७२५२- २३१४९४ या
क्रमांकावर संपर्क साधावा, असे श्रीमती
बजाज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Comments
Post a Comment