वाशिम , दि . ३० : वाशिम जिल्हा गॅझेटियर निर्मितीचे काम राज्य शासनाच्या दर्शनिका विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे. या अनुषंगाने आज प्राथमिक बैठक जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली व दर्शनिका विभागाचे सचिव डॉ. दि. प्र. बलसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीत जिल्हा जिल्हा गॅझेटियरच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा गॅझेटियरच्या संपादकीय मंडळाचे सदस्य प्रा. हरिभाऊ क्षीरसागर, ज्येष्ठ कादंबरीकार बाबाराव मुसळे, ‘काव्याग्रह’चे विठ्ठल जोशी, प्रा. गजानन वाघ, मोहन शिरसाट यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. वाशिम जिल्हा गॅझेटियरमध्ये जिल्ह्याची भौगोलिक, ऐतिहासिक, कृषि, उद्योग, बँकिंग, व्यापार, व्यवसाय, दळणवळण, आर्थिक विकास, प्रशासन, सामाजिक सेवा, संस्कृती यासह प्रेक्षणीय स्थळांची सविस्तर माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे. या प्रत्येक विषयांवर स्वतंत्र प्रकरण जिल्हा गॅझेटियरमध्ये समाविष्ट असणार आहे...