वाशिम जिल्ह्यात ९५ हजार ८६३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

वाशिम, दि. १२ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत जिल्ह्यातील ९५ हजार ८६३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यामध्ये ७१ हजार ९५४ शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी तर ७ हजार ३६४ शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजनेचा लाभ मिळणार आहे. १६ हजार ५४५ शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यात साधारण ४१ लाख शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी १९  हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. या योजनेत ७७ लाख अर्ज प्राप्त झाले होते. छाननीअंतर्गत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करुन ६९ खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यापैकी जवळपास ४१ लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे १९ हजार कोटी रुपये इतका निधी हस्तांतरित करण्यात आला आहे. जे शेतकरी पात्र होते ते अर्ज करु शकले नाहीत अशा शेतक-यांनाही  या योजनेत सामावून घेतले जाणार आहे. शेवटच्या पात्र शेतक-याला मदत मिळेपर्यंत ही योजना सुरु ठेवण्यात येणार आहे.

 शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची ही योजना कृषी व्यवस्थेला बळ पुरवणारी ठरली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाचे दीड लाख रुपयांपर्यतचे कर्ज माफ करणे,नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांपर्यत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांना योजनेत सामावून घेण्यात आले आहे. योजनेच्या गतिमान व पारदर्शक कार्यवाहीसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणारी जिल्हा सहकारी बँक व विविध राष्ट्रीयकृत बँकांवर कर्जमाफीची रक्कम वितरणाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. ऑनलाईन प्रक्रियेसाठी अद्ययावत यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे देशातील आजवरची सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी गतीने होण्यास मदत झाली आहे.

जिल्ह्यातील शेतक-यांच्या खात्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँकेमार्फत जिल्ह्यातील शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रियेने आता वेग घेतला आहे. जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहणार नाही, असे शासनाचे धोरण आहे. कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्याने शेतकरी बांधवांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. कोकलगाव येथील शेतकरी उद्धव विश्वनाथ काळबांडे यांनी सांगितले की, मी सन २०११-१२ मध्ये अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तोंडगाव शाखेतून ४० हजार ६०० रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. मात्र अपुऱ्या पावसामुळे हे कर्ज वेळेत फेडणे शक्य झाले नाही. पहिलेच कर्ज थकीत असल्याने शेतीच्या कामासाठी नवीन पीक कर्जही मिळत नव्हते. मात्र आता शासनाच्या कर्जमाफी योजनेमध्ये माझे थकीत कर्ज माफ झाल्याच्या मेसेज मला मिळाला आहे. त्यामुळे मी खूप समाधानी आहे. शेतीच्या कामासाठी नवीन कर्ज मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. त्यामुळे नव्या जोमाने शेती करून यापुढे पीक कर्ज थकीत राहणार नाही, याची काळजी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे