तूर पिकावरील मर सदृश्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी फवारणी, आळवणीचा सल्ला

वाशिम, दि. ०२ : जिल्ह्याच्या काही भागात मागील पंधरवड्यात तुरळक प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. तसेच काही भागात दाट धुके पडल्याने तूर पिकावर आकस्मिक मर सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. मुरली इंगळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या वाशिम कृषि संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भरत गीते, अकोला येथील कीटक शास्त्रज्ञ डॉ. विनोद सोनाळकर, भाजीपाला तसेच फलोत्पादन शास्त्रज्ञ डॉ. एस. एम. घावडे, जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयातील डॉ. इरफान हुसेन, करडा येथील कृषि विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ तुषार देशमुख आदींनी मंगरूळपीर तालुक्यातील हिसई, रहित व चिंचाळ परिसरात दिलेल्या क्षेत्र भेटीत तूर पिकावरील मर सदृश्य रोगामुळे काही प्रमाणत झाडे सुकल्याचे निदर्शनास आले आहे. हवामानाचा परिणाम व जमिनीतील बुरशीमुळे या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे मत शास्त्रज्ञांनी यावेळी व्यक्त केले.

मर सदृश्य रोगावर नियंत्रण आणण्यासाठी शेतकऱ्यांनी १९:१९:१९ या खताची एक फवारणी करावी. याचे प्रमाण साधारणतः १० लिटर पाण्याला १०० ते २०० ग्रॅम असे ठेवावे. तसेच शक्य झाल्यास कॉपर ऑक्झीक्लोराईडची आळवणी (ड्रेचींग) करावी, यामध्ये १० लिटर पाण्याला १५ ग्रॅम असे प्रमाण ठेवावे. त्यामुळे बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावास आळा घालता येईल. या रोगाचा प्रादुर्भाव मालेगाव परिसरातील मुंगळा, खेर्डी, रेगाव, कळंबेश्वर, पांगरी बु. या परिसरातही काही प्रमाणात निदर्शनास येत आहे. तरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी वरील पध्दतीने उपाययोजनांचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे