मौखिक आरोग्य तपासणी मोहीम, मोतीबिंदुमुक्त महाराष्ट्र अभियानाचा शुभारंभ



·        मौखिक तपासणी, नेत्र चिकित्सा कक्षाचे उद्घाटन
वाशिमदि०२ : तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या कर्करोगाने दरवर्षी अनेकांचा मृत्यू होत आहे. तंबाखू सेवन आणि त्यामुळे होणाऱ्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मौखिक आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत ३० वर्षांवरील व्यक्तींची मौखिक तपासणी व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष महिमेचा तसेच मोतीबिंदुमुक्त महाराष्ट्र अभियानाचा शुभारंभ आज खासदार भावना गवळी व आमदार राजेंद्र पाटणी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आयोजित कार्यक्रमात झाला.
यावेळी वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती सुधीर गोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, वाशिमचे उपनगराध्यक्ष रुपेश वाघमारे, वाशिम नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा समितीचे सभापती राहुल तुपसांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जे. एम. जांभरुणकर, डॉ. अनिल कावरखे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. गवळी म्हणाल्या की, आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा आपल्याला आजार होऊ नये, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आपल्या आरोग्यासाठी काय खावे, काय खाऊ नये? याबाबत प्रत्येकाने दक्ष असावे. तंबाखूजन्य पदार्थांमुळे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवसव वाढत आहे. त्यामुळे अशा पदार्थाचे कोणीही सेवन करू नये. कोणतेही व्यसन हे आरोग्यासाठी घातक असते. आरोग्य विभागाने याबाबत सुरु केलेल्या मोहिमेत लोकांना तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती मिळण्यास मदत होईल. नागरिकांनीही या मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवावा. तसेच निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने व्यसनमुक्तीचा संकल्प करावा, असे आवाहनही खा. गवळी यांनी यावेळी केले. जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्ररोग उपचार व मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुविधा अधिक सक्षम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
आ. पाटणी म्हणाले, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण युवकांमध्ये अधिक आहे. महाविद्यालयातील विद्यार्थीही आज तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करताना दिसतात. याविषयी पालकांनी जागृत राहणे आवश्यक आहे. तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या सेवनामुळे मानवी शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती लोकांना देणे आवश्यक आहे. यासाठी प्रसारमाध्यमांनी सुध्दा पुढाकार घ्यावा. मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करून त्यापदार्थांच्या सेवनाने झालेल्या दुष्परिणामांची जाणीव संबंधित व्यक्तीला करून देणे आवश्यक आहे. जनजागृती हाच तोंडाच्या कर्करोगावर नियंत्रण मिळविण्याचा उपाय असल्याचे आ. पाटणी यावेळी म्हणाले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्र शस्त्रक्रिया पुन्हा मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना लाभ मिळणार आहे. मोतीबिंदुमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने पुढाकार घेऊन जास्तीत जास्त रुग्णांची नेत्रतपासणी व आवश्यक उपचार करावेत, असे आ. पाटणी म्हणाले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील म्हणाले, आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मौखिक आरोग्याच्या विषयवर ग्रामीण भागात अधिक जनजागृती होणे आवश्यक आहे. लोकांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी त्या व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम त्यांच्या लक्षात आणून दिले पाहिजेत. यासाठी आशा वर्कर्स, ग्रामीण भागात काम करणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी प्रयत्न करावेत.
यावेळी नगराध्यक्ष श्री. हेडा, आरोग्य समिती सभापती श्री. गोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सेलोकर यांनी मनोगत व्यक्त केले. या मोहिमेंतर्गत मौखिक तपासणी व नेत्र तपासणीसाठी सुरु करण्यात आलेल्या कक्षांचे यावेळी खा. गवळी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राऊत यांनी केले तर सूत्रसंचालन नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. जगदीश बाहेकर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे