जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप; प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


वाशिम, दि. १५ : राज्य शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या धोरणानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय काम वाटप समितीमार्फत जिल्ह्यातील सुशिक्षित बरोजगारांच्या सेवा सोसायटींना कंत्राटी तत्त्वावर काम वाटप करण्यात येते. त्यानुसार जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राकडे जिल्हाधिकारी कार्यालय अल्पसंख्यांक मुलींचे वसतिगृह येथे २ सुरक्षा रक्षक महिला गार्ड व जिल्हा क्रीडा संकुल समिती येथे १ संगणक चालक, १ लिपिक, १ शिपाई व १ सफाईगार तसेच जिल्हा क्रीडा परिषद येथे १ संगणक चालक, 2 मैदानी सेवक व मंगरूळपीर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील १ सफाईगार, वाशिम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील १ सफाईगार ही पदे ११ महिने मानधन तत्त्वावर भरण्यासाठी मागणी पत्र सादर केले आहे.
जिल्ह्यातील इच्छुक व पात्र जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार सेवा सोसायटींनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपले प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय इमारत खोली क्र. ११, काटा रोड, वाशिम येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी केले आहे.
बरोजगारांची स्थापन केलेली सहकारी सेवा सोसायटी ही सहकार कायदा १९६० अन्वये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच ही संस्था कार्यरत असल्याबाबत जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक उपनिबंधक यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. संस्थेतील सदस्य क्रियाशील असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. प्रस्ताव सादर करणाऱ्या संस्थेचा आर्थिक वर्ष २०१८-१९ चा लेखा परिक्षण अहवाल सादर करावा. सुशिक्षित बेरोजगार संस्थेची नोंदणी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडे असणे आवश्यक आहे. बेरोजगार सेवा सोसायटी संबंधात वेळोवेळी निर्गमीत झालेले शासननिर्णय विचारात घेण्यात येतील. काही अडचणी असल्यास अथवा अधिक माहितीसाठी संबंधितांनी कार्यालयीन वेळेत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र येथे संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावे, असे श्रीमती बजाज यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे