प्रत्येक मराठी माणसाने मराठीचा अभिमान बाळगावा






·         मराठी भाषा गौरव दिनी मान्यवरांचे प्रतिपादन
·         जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचा उपक्रम
वाशिम, दि. २७ : मराठी ही आपली मातृभाषा आहे. सुमारे २ हजार वर्षांचा इतिहास असलेल्या मराठी भाषेचा प्रत्येक मराठी माणसाने अभिमान बाळगला पाहिजे, असे मत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातील प्रमुख वक्त्यांनी मांडले. वाशिम जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने आज, २७ फेब्रुवारी रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मराठी भाषेचे अभ्यासक, लेखक प्रा. गजानन वाघ, सुप्रसिद्ध कवी मोहन शिरसाट व कवी महेंद्र ताजणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी ज. सु. पाटील यांच्यासह पत्रकार, युवक-युवतींची उपस्थिती होती. ग्रंथपूजनाने कार्यक्रमाचे उदघाटन झाले. तसेच यावेळी उपस्थितांना मराठी भाषेच्या संवर्धनाची प्रतिज्ञा देण्यात आली.
मराठी भाषा, अभिजात भाषा : मोहन शिरसाट
मराठी भाषेला सुमारे २ हजार वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही मागणी गेली अनेक वर्षे होत आहे. या मागणीसाठी सादर करण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे कवी गुणाढ्य यांनी लिहिलेला ‘बृहत कथा’ हा आहे. पैशाची भाषेतील बृहत कथा हा सुमारे २ हजार वर्षांपूर्वीचा असून त्याचा लेखक गुणाढ्य हा वत्सगुल्म नगरीतील होता. त्याच्या ग्रंथाचा आधार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी घेतला जात असून ही वाशिमकरांच्या अभिमानाची बाब आहे, असे मत कवी मोहन शिरसाट यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा ही विविधांगी आहे, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रदेशात या भाषेचा वेगवेगळा गंध अनुभवायला मिळतो. या भाषेला दैदिप्यमान इतिहास आहे. मात्र मराठी भाषेची जपणूक करण्यात आज आपण कमी पडतो आहोत. प्रत्येक मराठी व्यक्तीने मराठीचा स्वाभिमान बाळगला पाहिजे. मराठी बाणा अंगिकारला पाहिजे. मराठी भाषा जिवंत ठेवायची असेल तर प्रत्येकाने मराठीचा वापर वाढवावा, असे आवाहन श्री. शिरसाट यांनी यावेळी केले.
भाषिक कौशल्य आत्मसात करा : प्रा. गजानन वाघ
मराठी ही आपली मायबोली आहे. तिचा आपल्याला अभिमान हवा. आज आपण दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर किती करतो, याचा प्रत्येकाने विचार करावा. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मराठीवर विविध अतिक्रमणे होत आहेत. आज मराठी सुद्धा इंग्रजीमध्ये लिहीणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मराठी भाषा टिकविण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत प्रा. गजानन वाघ यांनी व्यक्त केले.
मराठी साहित्याचा अभ्यास करून भाषिक कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न युवा पिढीने करावा. मराठी सुद्धा आपलाला यश मिळवून देणारी भाषा आहे. मराठी साहित्य विषय घेवून भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा यासारख्या महत्वाच्या पदांवर पोहोचलेले अधिकारी आपण पाहतो. त्यामुळे मराठी भाषेला तुच्छ न समजता तिचा अभिमान बाळगावा, असे आवाहन प्रा. वाघ यांनी यावेळी केले.
संत, साहित्यकांचे योगदान महत्वाचे : महेंद्र ताजणे
मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा आहे. मराठीच्या वाढीमध्ये संत साहित्यापासून ते अलीकडच्या आधुनिक साहित्यिकांचे फार मोठे योगदान आहे. या साहित्यामध्ये असलेल्या विविध विचार प्रवाहांनी मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये हातभार लावला आहे, असे मत कवी महेंद्र ताजणे यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा जपायची असेल तर मराठी वाचनाची, बोलण्याची आणि लिहिण्याची आवड प्रत्येकाने जोपासली पाहिजे. मराठी ग्रंथ चळवळ वाढली तरच मराठी भाषेला चांगले दिवस येतील. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ग्रंथ वाचन करावे, असे आवाहन श्री. ताजणे यांनी यावेळी केले.
प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी श्री. खडसे यांनी केले. ते म्हणाले, वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा होत आहे. दैदिप्यमान इतिहास असणाऱ्या मराठी भाषेची महती यानिमित्ताने सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. मराठी भाषेचा वापर वाढवा, यासाठी इयत्ता पहिले ते दहावीपर्यंत मराठी विषय शिकविणे बंधनकारक करण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाने घेतला आहे. तसेच मराठीला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी सुद्धा राज्य शासनाकडून प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल गजभारे यांनी केले, तर आभार प्रतिक पखाले यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे