जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यशाळेत आयकर कपाती विषयी मार्गदर्शन



वाशिम, दि. १३ : आयकर अधिनियम १९६१ अंतर्गत टीडीएस कपातीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आज, १३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पगारातून मासिक आयकर कपात, कराचा विहित कालावधीत भरणा करणे आदी विषयांवर अकोला येथील आयकर अधिकारी (टीडीएस) श्रीमती रश्मी देवपुजारी यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी (महसूल) रमेश काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव, उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक प्रशांत जाधव यांच्यासह जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकारी उपस्थित होते.
श्रीमती देवपुजारी म्हणाल्या, सर्व आहरण व संवितारण अधिकाऱ्यांनी नियमानुसार टीडीएस कपातीची आणि कपात केलेला टीडीएस विहित कालावधीत शासनास जमा करण्याची कार्यवाही करावी. कपात केलेली रक्कम कोणत्याही परिस्थितीत स्वतःकडे ठेवू नये. तसे करणे अनियमितता समजून सदर आहरण व संवितरण अधिकारी कायदेशीर कारवाईस पात्र ठरतो.
आयकर निरीक्षक उज्ज्वल कुल्हारा यांनीही यावेळी उपस्थितांना टीडीएस, टीसीएस योग्य प्रमाणात कसे संकलित करावे, याविषयी मार्गदर्शन केले. तसेच आयकर कपात विषयी आहरण व संवितरण अधिकारी व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची जबाबदारी याविषयी सुद्धा त्यांनी पीपीटीद्वारे मार्गदर्शन केले.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हिंगे म्हणाले, कार्यशाळेच्या माध्यमातून सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना आयकर कपातीबाबत केलेल्या मार्गदर्शनामुळे कार्यालयीन कामकाज अचूक होण्यास मदत होईल.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे