प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना लाभार्थ्यांसाठी पीक कर्ज पुरवठा विशेष मोहीम - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक



वाशिम, दि. १० : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्याप कोणत्याही वित्तीय संस्था व बँकांकडून पीक कर्ज घेतलेले नाही, अशा शेतकऱ्यांनी पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे अवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये २ लाख १७ हजार १९४ शेतकऱ्यांची प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी म्हणून नोंद झाली आहे. यापैकी १ लाख ५६ हजार ८८५ लाभार्थी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या वित्तीय संस्था व बँकाकडून पीक कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. कोणत्याही वित्तीय संस्था तसेच बँकांकडून पीक कर्ज न घेतलेले प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचे ६० हजार ३०९ लाभार्थी शेतकरी जिल्ह्यामध्ये आहेत. या शेतकऱ्यांना बँकींग क्षेत्राकडून पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट ऑफ फायनान्शीयल सर्व्हीसेस तथा कृषी मंत्रालयाचे आदेश प्राप्त झाले आहेत. या शेतकऱ्यांना अर्ज करता यावा, यासाठी आयबीए संस्थेकडून एक पानी अर्जाचा नमुना सर्व बँकांना उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांनी या अर्जासोबत शेतीचे उतारे व कर्ज नसल्याबाबतचे घोषणापत्र घेऊन ज्या बँकेमधून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतला आहे, तेथे संपर्क साधावा. कोणत्याही बँक अथवा वित्तीय संस्था येथे पीक कर्ज नसणाऱ्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज प्रोसेसिंग फी व निरीक्षण खर्च बँकांकडून माफ करण्यात येणार आहे. परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना बँकामार्फत किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) योजनेंतर्गत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. ही विशेष मोहीम २५ फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी गाव पातळीवर यासाठी विशेष प्रयत्न करून आपल्या कार्यक्षेत्रातील बँकांना सर्वतोपरी सहकार्य करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे