अपघात रोखण्यासाठी उपाययोजना आवश्यक - खासदार भावना गवळी



·        रस्ता सुरक्षा संसदीय क्षेत्र समिती सभा
·        प्रमुख मार्ग, चौकात दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचना
·        अवैध गतिरोधक, अपघातस्थळांचा अहवाल सादर करा
वाशिम, दि. १७ : अपघातात होणाऱ्या मृत्युंचे प्रमाण कमी होणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यात अपघात रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत. रस्ता सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना खासदार तथा रस्ता सुरक्षा संसदीय क्षेत्र समितीच्या अध्यक्ष भावना गवळी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, १७ फेब्रुवारी रोजी झालेल्या रस्ता सुरक्षा संसदीय क्षेत्र समितीच्या सभेत त्या बोलत होत्या.
यावेळी वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, जयंत देशपांडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तानाजी नरळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य महामार्ग महामंडळ व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
खा. गवळी म्हणाल्या, जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची कामे सध्या सुरु आहेत, त्यामुळे उपलब्ध करून देण्यात आलेले पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी योग्य असल्याची खात्री करावी. जिल्ह्यातील अवैध गतिरोधकांची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने समितीला सादर करावा. तसेच अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख रस्ते व मुख्य चौकांमध्ये दिशादर्शक फलक बसविण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. वाशिम शहरातील पार्किंगला शिस्त लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाव्यात. शहरातील प्रमुख चौकात सिग्नल बसविण्याची कार्यवाही लवकर पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले.
वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघाताचे प्रमाण कमी होवू शकते. शालेय जीवनातच वाहतूक नियमांचे पालन करण्याचे संस्कार विद्यार्थ्यावर होणे आवश्यक आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालय स्तरावर असलेल्या परिवहन समित्यांचे गठन करून त्या कार्यरत राहतील, याची दक्षता घ्यावी. सर्व वाहनधारकांनी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करणे आवश्यक आहे, याबाबत जनजागृती करावी. अपघातामध्ये जखमीला तातडीने मदत मिळाल्यास त्याचा जीव वाचू शकतो. त्यामुळे अपघातस्थळी रुग्णवाहिका व वैद्यकीय मदत तातडीने पोहोचेल, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना खा. गवळी यांनी यावेळी दिल्या.
वाशिम शहरातील प्रमुख चौकांमध्ये सिग्नल बसविण्याची कार्यवाही ३१ मार्च अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच याठिकाणी सीसीटीव्ही सुद्धा कार्यरत राहणार असल्याचे नगराध्यक्ष श्री. हेडा यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, अपघात होताच सार्वजनिक बांधकाम विभाग, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने अपघातस्थळाला भेट देवून सदर अपघाताचा अहवाल तयार करून समितीला सादर करावा. जेणेकरून अपघातांची कारणे शोधून ती दूर करण्यासाठी प्रयत्न करणे शक्य होईल, असे सांगून जिल्ह्यातील अवैध गतिरोधक व सातत्याने अपघात होणाऱ्या ठिकाणांचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
पोलीस अधीक्षक श्री. परदेशी म्हणाले, वाहन चालविताना सीट बेल्टचा वापर करणे आवश्यक आहे. सीट बेल्टमुळे आपला जीव वाचू शकतो. सीट बेल्टच्या वापराविषयी जनजागृती करण्यासाठी पोलीस दलामार्फत मोहीम हाती घेण्यात येणार आहे. तसेच विशेष मोहीम राबवून सीट बेल्टचा वापर होतो किंवा नाही, याची तपासणी केली जाईल. शासकीय वाहने तसेच खासगी वाहनचालकांनी वाहन चालविताना सीट बेल्टचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे