दहावी, बारावी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
वाशिम, दि. १७ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० या कालावधीत जिल्ह्यातील एकूण ६५ परीक्षा केंद्रांवर व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) ३ ते २३ मार्च २०२० या कालावधीत जिल्ह्यातील एकूण ८६ परीक्षा केंद्रांवर होत आहे. या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच परीक्षा केंद्रांभोवती कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी इयत्ता १२ वी परीक्षा होणाऱ्या सर्व परीक्षा केंद्रांच्या २०० मीटर परिक्षेत्रात १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० या कालावधीत तसेच इयत्ता १० वी परीक्षा केंद्रांच्या परिसरात ३ ते २३ मार्च २०२० या काळात (सुट्टीचे दिवस वगळून) फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आले असून परीक्षा केंद्रांवर ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही. परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिक्षेत्रात केंद्राधिकारी, सहाय्यक कर्मचारी, परीक्षार्थी, परीक्षेसाठी नियुक्त समन्वय अधिकारी व जिल्हाधिकारी यांचेकडून नियुक्त केलेले अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर इसमांना प्रवेशास मनाई राहील. परीक्षा केंद्रावर २०० मीटरचे आत रस्त्यावरून वाहन नेण्यास मनाई राहील. एकाचवेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्रावर प्रवेश करता येणार नाही. परीक्षा केंद्रांच्या २०० मीटर परिसरातील टेलिफोन, एस.टी.डी., आय.एस.डी., झेरॉक्स, फॅक्स, ध्वनिक्षेपके इत्यादी सुविधांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. परीक्षा केंद्रावर मोबाईल फोन, वायरलेस सेट, रेडीओ, दूरदर्शन, कॅल्क्युलेटर, कॉम्प्युटर व इतर प्रसारमाध्यमे वापरण्यास मनाई आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
Comments
Post a Comment