कळंबा महाली, सावरगाव बर्डे येथे आधार प्रमाणीकरण सुरु





महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

·         पहिल्या टप्प्यात दोन गावातील शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध
·         आधार प्रमाणीकरणसाठी गावातच सुविधा उपलब्ध
·         कर्जमुक्तीमुळे शेतकऱ्यांना दिलासा
वाशिम, दि. २४ : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी आज, २४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाली. जिल्ह्यातील कळंबा महाली व सावरगाव बर्डे येथील ४३७ शेतकऱ्यांच्या नावांचा या यादीमध्ये समावेश आहे. यादीमध्ये नावे असलेल्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही दोन्ही गावांमध्ये सुरु झाली आहे. दोन्हीं गावांमध्ये आपले सरकार सेवा केंद्र तसेच जिल्हा प्रशासन व अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत विशेष शिबीराच्या माध्यमातून आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही होत आहे.
कर्जमुक्ती योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या पहिल्या यादीत कळंबा महाली गावातील २६६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांची नावे असलेल्या यादीच्या प्रती ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच ग्रामपंचायत परिसरातील आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कार्यालय परिसरातच जिल्हा प्रशासन व अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यामार्फत आधार प्रमाणीकरणसाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही गतीने सुरु होती.
वाशिमचे तहसीलदार विजय साळवे, सहाय्यक निबंधक आर. एल. गाडेकर, आपले सरकार सेवा केंद्रचे समन्वयक भगवंत कुलकर्णी, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष तलवारे यांनी आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण केले.
सावरगाव बर्डे येथील १७१ शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीमध्ये आहेत. सावरगाव येथेही आपले सरकार सेवा केंद्र आणि विभाग व अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यामार्फत आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही करण्यात आली. यावेळी सहाय्यक निबंधक श्री. अंभोरे, आपले सरकार सेवा केंद्रचे जिल्हा समन्वयक सुनील देशमुख, आपले सरकार सेवा केंद्र संचालक विजय पाटील उपस्थित होते.
गावातच आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी सकाळपासूनच उपस्थिती लावून आधार प्रमाणीकरण करून घेतले. आर्थिक परिस्थितीमुळे पीक कर्जाची परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ भेटल्याने दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल शेतकऱ्यांनी राज्य शासनाचे आभार मानले.
डोक्यावरील कर्जाचा बोजा दूर झाला : पंकज महाले

मी सन २०१७ मध्ये पिक कर्ज घेतले होते. मात्र गेली दोन वर्ष पावसाने दगा दिल्याने शेतीती पुरेसे उत्पन्न मिळालं नाही, त्यामुळे इच्छा असूनही कर्जाची परतफेड करू शकलो नाही. यंदाही अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे उत्पन्न घटले आहे. राज्य सरकारने कर्जमुक्ती योजना राबवून आमचे कर्ज माफ केले, त्यामुळे आमच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा दूर झाला असून मी सरकारचे आभार मानतो, असे कळंबा महाली येथील शेतकरी पंकज रामकृष्ण महाले यांनी सांगितले. त्यांना ७२ हजार २२३ रुपयांच्या कर्जमुक्तीस ते पात्र ठरले आहेत.

गावातच आधार प्रमाणीकरण झाले : आत्माराम महाले
२०१७ मध्ये विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून पिक कर्ज घेतले, पण आर्थिक परिस्थितीमुळे या कर्जाची परतफेड करता आली नाही. मात्र राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये माझे नाव कर्जमुक्तीस पात्र शेतकऱ्यांच्या यादीत आले असून मी आजच आधार प्रमाणीकरण केले आहे. गावातच आधार प्रमाणीकरणाची सुविधा मिळाल्याने गैरसोय झाली नाही. माझे ५४ हजार ७५८ रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. त्याबद्दल मी राज्य शासनाचे आभार मानतो, असे कळंबा महाली येथील शेतकरी आत्माराम महाले यांनी सांगितले.

कर्जमुक्तीमुळे दिलासा मिळाला : अशोक कड
सावरगाव बर्डे विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून मी २०१६ मध्ये कर्ज उचलले होते. पण त्यानंतर दोन-तीन वर्षे अपुऱ्या पावसाने शेतीतील उत्पन्न कमी झाल्याने कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नाही. यंदाही अवेळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे उत्पन्न घटले. मात्र राज्य शासनाच्या कर्जमुक्ती योजनेमध्ये माझे सर्व १ लक्ष ८८ हजार ५०९ रुपये पिक कर्ज माफीस पात्र ठरल्याने मला दिलासा मिळाला असल्याचे सावरगाव बर्डे येथील शेतकरी अशोक ग्यानुजी कड यांनी सांगितले. तसेच शेतकरी कर्जमुक्ती योजनेबद्दल त्यांनी राज्य सरकारला धन्यवाद दिले.
सावरगाव बर्डे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष किशोर प्रल्हाद कड यांनीही कर्जमुक्ती योजनेचे स्वागत केले. तसेच विविध कार्यकरी सेवा सोसायटीच्या सभासद कर्जदार शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची त्यांनी यावेळी माहिती दिली.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे