महिला बचत गट होणार ‘डीजीटल’
\· बचत गटांचे व्यवहार पारदर्शी होणार
· प्रत्येक सदस्याला एसएमएसद्वारे मिळणार व्यवहाराची माहिती
वाशिम, दि. १८ : राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड)द्वारा जिल्हातील सर्व महिला बचत गटांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी ‘ई-शक्ती’ कार्यक्रम वाशिम महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्हातील दोन हजार बचत गटांच्या डिजिटलायझेशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ई-शक्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून डिजिटलायझेशन करण्यासाठी बचत गटांच्या ६० अॅनिमेटर यांना आज, १८ फेब्रुवारी रोजी स्मार्टफोनचे वाटप करण्यात आले.
बचत गटांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी ई-शक्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून नाबार्ड प्रयत्न करीत आहे. बचत गटांचे सर्व व्यवहार ऑनलाईन व अपडेट करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वाशिम जिल्हा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अॅनिमेटर यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी ‘नाबार्ड’चे सहाय्यक महाप्रबंधक विजय खंडरे व ‘माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांच्या हस्ते ६० अॅनिमेटर यांना स्मार्टफोनचे वाटप करण्यात आले.
जिल्ह्याट सुरुवातीला ६ तालुक्यातील २००० बचत गटांचे डिजिटलायझेशन ई-शक्ती कार्यक्रमाद्वारे करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे बचत गटांचे व्यवहार पारदर्शी होवून प्रत्येक सदस्याला एसएमएसद्वारे गटाच्या आर्थिक व्यवहाराची अद्यावत माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच बचत गटांना बँकेकडून कर्ज सुविधा मिळण्यास सोयीस्कर होणार आहे, अशी श्री. खंडरे यांनी यावेळी दिली.
यावेळी अॅनिमेटर यांना मोबाईल वापरून गटांची माहिती अद्यावत करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात औरंगाबाद येथील श्री. सोनोने तसेच श्री. पट्टेबहाद्दूर यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी लोकसंचालित साधन केंद्राचे सर्व व्यवस्थापक, लेखापाल, सहयोगिनी व अनिमेटर उपस्थित होते.
Comments
Post a Comment