मुद्रा योजना एलईडी व्हॅन, चित्ररथाला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी
·
हस्तपुस्तिका, स्टँडी, घडीपुस्तिकेचे विमोचन
वाशिम, दि. १२ : प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती जिल्ह्यातील होतकरू, गरजू
बेरोजगार युवक-युवतींपर्यंत पोहोचावी, यासाठी जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना
समन्वय समिती व नियोजन विभागामार्फत योजनेचा प्रचार, प्रसार करण्यात येत आहे. यानिमित्ताने
तयार करण्यात आलेल्या एलईडी व्हॅन व चित्ररथाला जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी
आज, १२ फेब्रुवारी रोजी हिरवी झेंडी दाखविली. तसेच प्रधानमंत्री मुद्रा योजना
विषयी माहिती देणाऱ्या हस्तपुस्तिका, स्टँडी व घडीपुस्तिकेचे विमोचनही यावेळी
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी
जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय
निनावकर, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास प्रबंधक विजय खंडरे, जिल्हा माहिती अधिकारी
विवेक खडसे, माहिती सहाय्यक तानाजी घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती.
गरजू
तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून
अर्थसहाय्य करण्यात येते. या योजनेविषयी जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना माहिती
मिळावी, यासाठी एलईडी व्हॅन वाहन व चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात जावून एलईडी व्हॅन व चित्ररथ योजनेचा प्रसार करणार आहेत.
यासोबतच प्रधानमंत्री मुद्रा योजना विषयक हस्तपुस्तिका व घडीपुस्तिकेचे वितरण केले
जाणार आहे. योजनेचे स्वरूप, मिळणारे अर्थसहाय्य, कोण-कोणत्या व्यवसायासाठी
अर्थसहाय्य मिळू शकते आदी बाबींची माहिती या घडीपुस्तिकेत देण्यात आली आहे. प्रधानमंत्री
मुद्रा योजना विषयी माहिती देणारी स्टँडीची निर्मिती करण्यात आली असून जिल्ह्यातील
राष्ट्रीयकृत बँकांच्या दर्शनी भागात या स्टँडी ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे
होतकरू, गरजू व बेरोजगार तरुण-तरुणींना या योजनेची माहिती मिळून स्वतःचा रोजगार
सुरु करण्यासाठी या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
*****
Comments
Post a Comment