तलाठी, आपले सरकार सेवा केंद्र चालक यांना आधार प्रमाणीकरणविषयी प्रशिक्षण



महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

·        जिल्हा, तालुकास्तरावर कार्यशाळा; माहितीपुस्तिकेचे वितरण
वाशिम, दि. १५ : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र, बँकेत या याद्या प्रसिद्ध करण्याची कार्यवाही होईल. यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र, बँक तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये जावून बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरणद्वारे आपल्या कर्ज रक्कमेचे प्रमाणीकरण करावे लागणार आहे. आधार प्रमाणीकरणविषयी तलाठी व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना सविस्तर माहिती देण्यासाठी आज, १५ फेब्रुवारी रोजी तालुका व जिल्हा स्तरावर कार्यशाळा घेण्यात आली.
जिल्हास्तरावर नियोजन भवन येथे जिल्ह्यातील १०९३ आपले सरकार सेवा केंद्रचालकांची कार्यशाळा झाला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील आधार प्रमाणीकरण प्रक्रीयेविषयी पीपीटी व मार्गदर्शक व्हिडीओच्या सहाय्याने माहिती दिली.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हिंगे म्हणाले, कर्जमुक्ती पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या नावासमोर एक विशिष्ट क्रमांक दिला जाणार आहे. शेतकऱ्यांनी हा विशिष्ट क्रमांक आपले आधारकार्ड व बँक पासबुक घेवून नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र, संबंधित बँक अथवा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीमध्ये जावून आपल्या नावासमोरील कर्ज रक्कम मान्य अथवा अमान्य असल्याचे प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत आपले सरकार सेवा केंद्र चालकांची भूमिका महत्वाची असून सर्व आपले सरकार केंद्र चालकांनी कर्जमुक्ती पोर्टलवर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध होताच त्याच्या प्रिंट काढून आपल्या केंद्रामध्ये दर्शनी भागात यादी प्रसिद्ध करावी. तसेच आधार प्रमाणीकरणसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना अचूक माहिती देवून त्यांना आवश्यक सहकार्य करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रमेश कटके, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ज्या आपले सरकार सेवा केंद्र परिसरात पात्र शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे, अशा ४० आपले सरकार सेवा केंद्र चालकांना यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने बायोमेट्रिक उपकरणे वितरीत करण्यात आली. तसेच प्रशिक्षणात सहभागी सर्व केंद्र चालकांना योजनेच्या माहितीपुस्तिकेचे वितरण करण्यात आले.
तालुका स्तरावर तलाठी प्रशिक्षण
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये आधार प्रमाणीकरण प्रक्रियेबाबत सर्व तलाठ्यांचे संबंधित तालुका स्तरावर प्रशिक्षण आज, १५ फेब्रुवारी रोजी झाले. आधार प्रमाणीकरण प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना अचूक माहिती देवून त्यांना आधार प्रमाणीकरणकरिता सहकार्य करण्याच्या सूचना यावेळी सर्व तलाठ्यांना देण्यात आल्या.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे