महिलांनी आपल्यामधील क्षमता ओळखण्याची गरज - आमदार लखन मलिक


वाशिम, दि. ०६ :  एकावेळी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळून प्रगती साधण्याची क्षमता महिलांमध्ये आहे. महिलांनी आपल्यामधील क्षमता ओळखल्याशिवाय त्या सक्षम होणार नाहीत, असे मत वाशिम-मंगरूळपीरचे आमदार लखन मलिक यांनी व्यक्त केले. महसूल सप्ताहानिमित्त वाटाणे लॉन येथे आयोजित महाराजस्व अभियानअंतर्गत महिला समाधान शिबाराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी वाशिमच्या नगराध्यक्ष लताताई उलेमाले, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, तहसिलदार बळवंत अरखराव, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष शरद पाटील आदी उपस्थित होते.
आमदार मलिक म्हणाले कि, महिलांना समानतेची वागणूक मिळावी, यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. महिलांनीही आपले हक्क, अधिकार समजून घेऊन त्याचा वापर स्वतःच्या व इतर महिलांच्या प्रगतीसाठी व सक्षमीकरणासाठी करावा.
नगराध्यक्ष लताताई उलेमाले म्हणाल्या की, समाजात महिलांचा सन्मान होणे आवश्यक आहे. महिलांना समानतेची वागणूक व उच्च शिक्षणाची संधी मिळायला हवी. प्रत्येक जबाबदारी यशस्वीपणे सांभाळण्याची शक्ती महिलांमध्ये असून त्यांना योग्य संधी मिळाली तर त्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात.
उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप म्हणाले की, १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालवधीत महसूल सप्ताहानिमित्त   महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. महिला सक्षमीकरणासाठी महसूल विभागामार्फत जनजागृती करण्यात आली. यामध्ये विविध विभागांच्या महिलांविषयक योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहचविण्यात आली. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन महिलांनी आपली व आपल्या कुटुंबाची विकास साधावा, असे आवाहनही डॉ. सानप यांनी केले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थीनीना जात प्रमाणपत्रे, महिला शेतकऱ्यांना सातबारा उतारा, पारधी समाजातील स्त्रीच्या नावे घर बांधणीसाठी जमीन पट्टे, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थी, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला लाभार्थींना धनादेश व संजय गांधी निराधार योजनेच्या महिला लाभार्थींना मंजुरी आदेशांचे वितरीत करण्यात आले. तसेच नगराध्यक्ष लताताई उलेमाले, तामसी येथील प्रगतशील महिला शेतकरी पुष्पाबाई कव्हर, राष्ट्रीय अॅथलेटिक्सपटू सविता वंजारी, आत्माच्या उपप्रकल्प संचालक अनिसा महाबळे, तलाठी पटुकले यांचा सन्मान करण्यात आला.

समाधान शिबिरामध्ये विविध विभागांशी संबंधित ३० तक्रारी प्राप्त झाल्या. यावेळी आरोग्य विभाग, आदिवासी विकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, पंचायत समिती, कृषी विभाग, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बचत गट, आधार नोंदणी केंद्रविषयी स्टॉल्स उभारण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार बळवंत अरखराव यांनी केले. सूत्रसंचालन तलाठी सरला राजूरकर यांनी तर आभार प्रदर्शन निवासी नायब तहसीलदार राहुल वानखेडे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे