जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘सायबर लॅब’


·        १५ ऑगस्ट रोजी होणार उदघाटन
·        राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती
·        सायबर गुन्ह्यांच्या तपासाला येणार गती
वाशिम, दि. १३ :  वाढत्या सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महाराष्ट्र सायबर प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अत्याधुनिक सायबर लॅबची निर्मिती करण्यात आली आहे. सोमवार, दिनांक १५ ऑगस्ट २०१६ रोजी सकाळी १० वाजता राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लॅबचे उदघाटन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी दिली आहे.
सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग असून इंटरनेटचा वापर वाढला आहे. ई-बँकिंग, ई-ऑफिस, ई-डॉक्युमेंटसारख्या संकल्पनांचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे गुन्ह्यांमध्ये आरोपींकडून इंटरनेट व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. या सायबर गुन्ह्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा मुख्यालयी सायबर लॅब सुरु करण्याचा निर्णय गृह विभागामार्फत घेण्यात आला आहे. सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आवश्‍यक असणारे सॉफ्टवेअर व तंत्रज्ञान सायबर लॅबमध्ये उपलब्ध असणार आहे. डिस्क इमेजिंग अॅण्ड अॅनालिसिस, मोबाईल फॉरेंसिक्स, लाइव्ह फॉरेंसिक्स, सीडीआर अॅनालिसिस, सोशल मिडिया ॲनालिटिक्स, व्हीडीओ अॅण्ड इमेज इनहान्सिंग याच्या सहाय्याने तपास करता येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. होळकर यांनी सांगितले.
सायबर गुन्ह्यांचा तपास करणे, गुन्ह्यातील जप्त संगणकीकृत पुराव्यांची तपासणी करणे याकरिता आजपर्यंत नागपूर, मुंबई येथील फोरेन्सिक लॅबवर अवलंबून रहावे लागत होते. ऑनलाइन फसवणूक, वाढत्या सायबर गुन्ह्यांची वाढती मर्यादा लक्षात घेता पोलीस तपास गतिमान होण्यासाठी जिल्हास्तरावर सुरु करण्यात आलेल्या सायबर लॅबची मदत होणार आहे. आजच्या काळात आरोपींकडून इंटरनेट व सोशल मीडियाचा उपयोग गुन्हे करण्यासाठी होत आहे. या गुन्ह्या संदर्भातील माहिती तत्काळ उपलब्ध होण्यासाठी तसेच आयटी ॲक्‍टअन्वये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास गतीने होण्यासाठी ही सायबर लॅब महत्त्वाची ठरणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले.
स्वातंत्र्यदिनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सायबर लॅबचे उदघाटन
वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सुरु होत असलेल्या सायबर लॅबचे उदघाटन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते दिनांक १५ ऑगस्ट २०१६ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावनाताई गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलिक, आमदार अमित झनक, वाशिमच्या नगराध्यक्ष लताताई उलेमाले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे