महिला सक्षमीकरणासाठी वाशिम तालुक्यात विविध उपक्रम

·        महसूल सप्ताहनिमित्त आयोजन
·        महिला आरोग्य शिबिराचे शुक्रवारी आयोजन
वाशिम, दि. ०३ :  राज्यात दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०१६ या कालावधीत महसूल सप्ताह आयोजित करण्यात आला असून यानिमित्त महिला सक्षमीकारणासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम तालुक्यातही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार बलवंत अरखराव यांनी दिली आहे.
दिनांक १ ऑगस्ट २०१६ रोजी वाशिम तालुक्यातील सर्व तलाठी साजाच्या ठिकाणी महसूल सप्ताहाच्या उदघाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आयोजित सभेमध्ये महिलांना महसूल विभागांच्या योजनांची माहिती देण्यात आली. तसेच महिला शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्याचे वाटप करण्यात आले. वाशिम तहसीलदार कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमामध्ये महसूलचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे व उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांच्या हस्ते महिला मतदारांना मतदान ओळखपत्रांचे वाटपही करण्यात आले आहे.
दिनांक २ ऑगस्ट २०१६ रोजी सर्व महसूल मंडळांच्या मुख्यालयी सर्व तलाठी, त्या मंडळातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सभेमध्ये महसूल सप्ताह अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. तसेच संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, अंत्योदय योजना, दुय्यम शिधापत्रिका, मतदार नोंदणी याविषयी मार्गदर्शन करून याकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन महिला लाभार्थ्यांना करण्यात आले आहे. दिनांक ३ ऑगस्ट २०१६ रोजी महसूल मंडळाच्या मुख्यालयी असलेल्या माध्यमिक शाळांमधील विद्यार्थिनींना जातीचे दाखले, रहिवासी दाखले, उत्पन्नाचे दाखले देण्याकरिता आवश्यक माहितीचे संकलन करण्यात आले. तसेच वरिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींना दुचाकीचे लर्निंग लायसन्स देण्यासाठी माहिती व अर्ज संकलित करण्यात आले आहेत. संकलित करणाऱ्या माहितीनुसार दाखले बनवून त्याचे दिनांक ४ ऑगस्ट २०१६ रोजी संबंधितांना वाटप करण्यात येणार असल्याचे तहसीलदार श्री. अरखराव यांनी सांगितले.
वाशिम तालुक्यातील महिलांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा, याकरिता शुक्रवार, दिनांक ५ ऑगस्ट २०१६ रोजी सकाळी ११ वाजता तालुक्यातील तोंडगाव, काटा, पार्डी टकमोर, अनसिंग व वारला या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये फक्त महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी शनिवार, दिनांक ६ ऑगस्ट २०१६ रोजी वाशिम येथील वाटणे लॉन्स येथे महाराजस्व अभियानअंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात महिलाविषयक विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात येणार आहेत. ही दोन्ही शिबिरे केवळ महिलांसाठी असून तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही तहसीलदार श्री. अरखराव यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे