महिलांमध्ये प्रत्येक जबाबदारी सक्षमपणे सांभाळण्याची क्षमता - आमदार अमित झनक


वाशिम, दि. ०६ :  आज महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये प्रवेश केला आहे. या क्षेत्रांमध्ये सोपविण्यात येत असलेली प्रत्येक जबाबदारी सक्षमपणे सांभाळून यशस्वी होण्याची क्षमता महिलांमध्ये असल्याचे प्रतिपादन रिसोड-मालेगावचे आमदार अमित झनक यांनी केले. महसूल सप्ताह निमित्त राबविण्यात येत असलेल्या महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत आयोजित महिला समाधान शिबिराप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी होते.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य अंजली शिंदे, तहसीलदार अमोल कुंभार माजी नगराध्यक्षा भारती क्षीरसागर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष दत्तात्रय खराडे, दंत चिकित्सक डॉ. कीर्ती पाटील, डॉ. विजयप्रसाद तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. झनक म्हणाले की, राज्य शासनाने महसूल सप्ताहनिमित्त महिला सक्षमीकरणविषयी अभियान राबवून महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. राज्य शासनाचा हा उप्रकम अतिशय कौतुकस्पद आहे. महिलांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा. यासाठी महिलांनी महिलांच्या विकासासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. महिला ज्या क्षेत्रात जातात, त्या क्षेत्राची प्रगती झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे महिलांनी व्यवसाय, नोकरीसोबतच इतर क्षेत्रातही पुढे यावे, असे आवाहनही आ. झनक यांनी यावेळी केले.
मुलींना जन्म घेऊ द्या, शिक्षण घेऊ द्या : जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी
महिलांविषयक योजनांची माहिती महिलांना मिळावी, त्यांच्या समस्या सोडविल्या जाव्यात, यानिमित्ताने १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०१६ या कालावधीत महसूल सप्ताहानिमित्त महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात आले. महिलांना समाजात समानतेची वागणूक मिळणे आवश्यक आहेत. त्यासाठी शासन विविध योजना राबवीत आहे. मात्र याकरिता महिलांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे. आज स्त्रीभ्रूण हत्या करून मुलीला जन्मापूर्वीच संपविले जात आहे. ही अतिशय खेदजनक बाब आहे. यावर उपाय म्हणून शासनाला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान राबवावे लागत आहे. समाजाने विशेषतः महिलांनी याबाबत गांभीर्याने विचार करावा. मुलीना जन्म घेऊ द्या, शिक्षण घेऊ द्या, त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी पाठबळ द्या, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
विविध योजनांच्या लाभार्थी महिलांना धनादेश वाटप
राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना अंतर्गत २६ पात्र लाभार्थी महिलांना आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रत्येकी २० हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला मीरा गायकवाड यांना १ लक्ष रुपयेचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी ५४ महिलांना मंजुरी आदेशाचे वितरण करण्यात आले. विविध क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थिनी, खेळाडू यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. ५० विद्यार्थिनींना आदीवास प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. समाधान शिबिरामध्ये महिलांनी विविध विभागांशी संबंधित ३३५ तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारी तातडीने निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
आरोग्य शिबीर, निबंध स्पर्धेला प्रतिसाद
महिलांसाठी आरोग्य शिबीर, विद्यार्थिनींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा व निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. रिसोड ग्रामीण रुग्णालय व डॉक्टर्स असोसिएशन यांच्या मदतीने आयोजित आरोग्य शिबिरामध्ये महिलांचा रक्तगट, मधुमेह, हिमोग्लोबिन यांची तपासणी करण्यात आली. यावेळी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ विषयावरील निबंध स्पर्धेमध्ये ३२६ मुलींनी सभाग नोंदविला. समाधान शिबिरानिमित्त मतदार नोंदणी, महिला व बालविकास विभाग, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, एकात्मिक बालविकास कार्यक्रमअंतर्गत पाक कृतीविषयक स्टॉल्स उभारण्यात आले होते. विविध विभागांच्या महिलाविषयक योजनांची माहिती देणाऱ्या घडीपुस्तिकेचे यावेळी वाटप करण्यात आले. अंध बालकलाकार चेतन उचित याच्या जनजागृती कार्यक्रमाचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे