सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करा - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण





    तोंडगाव येथील शेततळ्यामध्ये जलपूजन
वाशिम, दि. १५ :  राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानामुळे विकेंद्रित जलसाठे निर्माण होत आहेत. यामधील पाण्याचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा अवलंब करावा, असे आवाहन राज्याच्या बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेमधून वाशिम तालुक्यातील तोंडगाव येथे तयार करण्यात आलेल्या तळ्यामध्ये जलपूजन प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, तहसीलदार बळवंत अरखराव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरीकर आदी उपस्थित होते.
ना. चव्हाण म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानात लोकांचा सहभाग वाढत आहे. त्यामुळे या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप आले आहे. मागेल त्याला शेततळे योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकेंद्रित पाणीसाठे निर्माण होत असल्याने शेतीला संरक्षित सिंचनाची सोय होत आहे. शेततळ्यासारख्या कामांमुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होत आहे.  जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा योग्य वापर होण्यासाठी शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. सूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची बचत होते. तसेच उत्पादनात वाढ होऊन जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतो, असे त्यांनी सांगितले. ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून शेततळे घेणारे शेतकरी विठ्ठल गोटे व भानुदास गोटे या शेतकऱ्यांचा यावेळी ना. चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे