‘सायबर लॅब’मुळे गुन्ह्यांचा तपास गतीने होणार - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण





वाशिम, दि. १५ :  सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महाराष्ट्र सायबर प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अत्याधुनिक सायबर लॅबची निर्मिती करण्यात आली असून या लॅबमुळे गुन्ह्यांचा तपास गतीने करून गुन्हेगारांवर वचक बसविता येणार असल्याचे प्रतिपादन असल्याचे राज्याच्या बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण केले. वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर लॅबच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. हर्षदा देशमुख, वाशिम-मंगरूळपीरचे आमदार लखन मलिक, कारंजा-मानोराचे आमदार राजेंद्र पाटणी, वाशिमच्या नगराध्यक्ष सौ. लताताई उलेमाले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.
ना. चव्हाण म्हणाले की, आज गुन्हेगारांकडून इंटरनेट व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. ई-बँकिंग, ई-ऑफिस, ई-डॉक्युमेंटसारख्या संकल्पनांचा उपयोग मोठ्या प्रमाणात असल्याने सायबर गुन्हे वाढत आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा मुख्यालयी सायबर लॅब सुरु करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यानुसार गृह विभागामार्फत राज्यात जिल्हा मुख्यालायांच्या ठिकाणी सायबर लॅबची निर्मिती करण्यात आलेली आहे. सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आवश्‍यक असणारे सॉफ्टवेअर व तंत्रज्ञान जिल्ह्याच्या ठिकाणी सायबर लॅबमध्ये उपलब्ध झाल्याने अशा गुन्ह्यांचा तातडीने तपास करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले की, गुन्हेगारांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने त्यांचावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनीही तंत्रज्ञानाचा वापर करणे क्रमप्राप्त आहे. जिल्हास्तरावर सुरु करण्यात आलेल्या या लॅबमधील सर्व सॉफ्टवेअरचा प्रभावी वापर करून पोलीस यंत्रणेला सायबर गुन्हे रोखण्यासह इतर गुन्ह्याच्या तपासाला मदत होणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर म्हणाले की, सायबर लॅबमध्ये डिस्क इमेजिंग, मोबाईल फॉरेंसिक, सीडीआर अॅनालिसिस, पासवर्ड क्रॅकिंग, व्हीडीओ फॉरेंसिक, सोशल मिडिया ॲनालिसिस याच्या साहाय्याने तपासणी करता येणार आहे. सायबर गुन्ह्यांचा तपास करणे, गुन्ह्यातील जप्त संगणकीकृत पुराव्यांची तपासणी करणे याकरिता आजपर्यंत नागपूर, मुंबई येथील फोरेन्सिक लॅबवर अवलंबून रहावे लागत होते. जिल्हास्तरावर सुरु करण्यात आलेल्या सायबर लॅबमुळे वेळेची बचत होणार असून गुन्ह्यांच्या तपासाला गती येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी राज्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते सायबर लॅबचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी लॅबची पाहणी करून उपलब्ध सॉफ्टवेअरच्या कार्यपद्धतीविषयी माहिती घेतली. नोडल अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्यासह प्रदीप डाखोरे व अमोल काळमुंदळे हे पोलीस दलाचे कर्मचारी सायबर लॅबचे काम पाहणार आहेत. त्यांना सी-डॅकमार्फत प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे