वाशिमकरांनी घेतली सामाजिक ऐक्याची प्रतिज्ञा
·
‘सदभावना
दिना’निमित्त जिल्हा प्रशासनाचा उपक्रम
·
सदभावना रॅलीत विद्यार्थी,
नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
वाशिम, दि. २० : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त २० ऑगस्ट हा दिवस
सदभावना दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त वाशिम जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज
सदभावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख,
कारंजा-मानोराचे आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते
हिरवी झेंडी दाखविल्यानंतर जिल्हा क्रीडा संकुल येथून सदभावना रॅलीला प्रारंभ
झाला. तत्पूर्वी सर्व उपस्थितांनी सदभावना दिनानिमित्त सामाजिक ऐक्यासाठी प्रयत्न
करण्याची प्रतिज्ञा घेतली.
याप्रसंगी
अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ. नसिरुद्दीन पटेल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर,
उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, शिक्षणाधिकारी
(प्राथमिक) डी. एच. जुमनाखे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ए. डी. मानकर, उपविभागीय
पोलीस अधिकारी जयकुमार चक्रे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेश गिरी, पोलीस
निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
जिल्हा
क्रीडा संकुल येथून सुरु झालेल्या सदभावना रॅलीमध्ये शहरातील नवोदय विद्यालय,
बाकलीवाल विद्यालय, राधादेवी बाकलीवाल कन्या शाळा, राणी लक्ष्मीबाई हायस्कूल, एस.
एम.सी. शाळा, लॉयन्स विद्या निकेतन, शिवाजी हायस्कूल, महात्मा गांधी नगर परिषद
हायस्कूल, गौरीशंकर विद्यालय व राजस्थान आर्य कॉलेज आदी शाळा, विद्यालयांचे सुमारे
१००० विद्यार्थी यांच्यासह जिल्हा पोलीस दलाचे जवान, नेहरू युवा केंद्र, भारत
स्काऊटस आणि गाईड्स सहभागी झाले होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख,
कारंजा-मानोराचे आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, अपर
जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनीही
रॅलीत सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटणी चौक, अकोला नाका, जिल्हा सामान्य रुग्णालय व
अग्निशमन केंद्र मार्गे जिल्हा क्रीडा संकुल आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला.
रॅलीमध्ये सहभागी झालेल्यांना मारवाडी युवा मंचच्यावतीने अल्पोपहार व आर्ट ऑफ
लिव्हिंगचे डॉ. हरीष बाहेती यांच्यामार्फत सरबत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे यांनी केले.
Comments
Post a Comment