‘स्वच्छ भारत अभियाना’त लोकसहभाग वाढण्याची गरज - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी



वाशिम, दि. ११ : स्वच्छ भारत अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळणे गरजेचे आहे. लोकसहभाग मिळालेली योजना अथवा अभियानाची अंमलबजावणी गतीने होण्यास मदत होते, असे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले. स्वच्छतेसाठी झटणारे सफाई कामगार व सामाजिक संस्था यांच्या सन्मानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी वाशिमच्या नगराध्यक्ष लताताई उलेमाले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा प्रशासन अधिकारी श्री. मोरे, वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेट्टे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले की, सदृढ आरोग्यासाठी स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. आपण स्वतःचे घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. घरातील कचरा उचलून बाहेर टाकतो. त्यामुळे घराचा परिसर अस्वच्छ बनतो. पर्यायाने गल्ली, शहर, गाव अस्वच्छ बनते व त्यामुळे रोगराई पसरते. ही अस्वच्छता दूर करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. आपण सर्वांनी मिळून स्वच्छतेचा आग्रह धरला पाहिजे. प्रत्येकाने स्वतःचे घर, घराचा परिसर यापासून स्वच्छतेला सुरुवात करावी. याकरिता विविध सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
नगराध्यक्ष लताताई उलेमाले म्हणाल्या की, स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. स्वच्छतेसाठी लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल घडवून आणणे गरजेचे आहे. तरच स्वच्छ भारत अभियान यशस्वी होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. सफाई कामगार, स्वच्छतेसाठी प्रयत्न करणाऱ्या नारायणबाबा भक्त मंडळाचेही नगराध्यक्षांनी कौतुक केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाशिम नगरपरिषदेच्या २०, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ३ सफाई कामगारांना फ्रेंडशिप बँण्ड बांधून व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. शहरातील नारायणबाबा तलावाची स्वच्छता व या तलावातील गाळ उपसा केल्याबद्दल नारायणबाबा भक्त मंडळाचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. हरीष बाहेती, अविनाश मारशेटवार, अनिल केंदळे, श्री. इंगोले आदींनी हा सत्कार स्वीकारला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. कार्यक्रमापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रास्ताविक जिल्हा प्रशासन अधिकारी श्री. मोरे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्याम जोशी यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे