कृषी क्षेत्राच्या सर्वांगीन विकासासाठी प्रयत्न - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण
·
भारतीय स्वातंत्र्याचा
६९ वा वर्धापन दिन उत्साहात
·
जलयुक्त शिवार अभियातील
लोकसहभागात वाढ
·
‘स्वच्छ
महाराष्ट्रासाठी १८ लाख भेटी’ उपक्रम राबविणार
वाशिम, दि. १५ : शेती आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी, याकरिता राज्य शासन
कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीत आहे. या अनुषंगाने राबविण्यात येत
असलेल्या योजना, उपाययोजनांना यश मिळत क्षेत्राच्या असल्याचे राज्याच्या
बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक
संरक्षण विभागाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. भारतीय
स्वातंत्र्याच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आयोजित मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत
होते. याप्रसंगी राज्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. हर्षदा देशमुख, वाशिम-मंगरूळपीरचे आमदार लखन मलिक,
कारंजा-मानोराचे आमदार राजेंद्र पाटणी, वाशिमच्या नगराध्यक्ष सौ. लताताई उलेमाले,
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर
जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, रोहयोचे
उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, जिल्हा नियोजन
अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के. एम.
अहमद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे, महेश पाटील यांच्यासह स्वातंत्र्य
सैनिक, माजी सैनिक, पत्रकार, नागरिक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ना.
चव्हाण म्हणाले की, राज्य शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार अभियानमधून सन
२०१५-१६ मध्ये जिल्ह्यात ३ हजार ९२० कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे ३४ हजार ८२५
टीसीएम पाणीसाठा तयार झाला असून ३४ हजार ८२५ हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची
सोय झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानात लोक सहभाग वाढत आहे. गेल्या दीड वर्षाच्या
कालावधीत जिल्ह्यामध्ये विविध प्रकल्पांमधील १९ लक्ष ४२ हजार घनमीटर गाळ
लोकसहभागातून उपसण्यात आला आहे. अरुणावती नदी खोलीकरण, शेलूबाजार येथील अडान नदी
खोलीकरण, कारंजा येथील सारंग तलावातील गाळ उपसा, भामदेवी येथील सलग समतल चर या
कामांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळाला आहे. तामसी येथील नागरिकांनी
लोकसहभागातून सुमारे ५ कोटी लिटर क्षमतेचा तलाव तयार केला आहे. लोकसहभागातून
झालेल्या कामांमुळे शासनाची सुमारे ८ कोटी ५० लक्ष रुपयांची बचत झाली आहे. सन
२०१६-१७ मध्ये १५० गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. याकरिता
१६१ कोटी ७६ लक्ष रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जलतज्ज्ञ डॉ.
राजेंद्रसिंह यांनी ११ जुलै २०१६ रोजी जलयुक्त शिवार अभियानातील भेटी दिल्या.
यावेळी त्यांनी जिल्ह्यात झालेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त केल्याचे त्यांनी
यावेळी सांगितले.
धडक
सिंचन व मनरेगा मधील सिंचन विहिरी पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. मनरेगा मधून
३ हजार १३७ विहिरी आणि धडक सिंचन कार्यक्रम अंतर्गत ५ हजार ८४६ विहिरी पूर्ण
झाल्या आहेत. यामुळे निर्माण झालेल्या सिंचन क्षमतेचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
विविध कारणांनी रखडलेले पाटबंधारे विभागाचे लघु प्रकल्प पूर्ण करण्यासाठी
शासनस्तरावरून प्रयत्न सुरु आहेत. गेल्या वर्षात १२ प्रकल्पांचे काम पूर्ण झाले
आहे. त्यामुळे ३७.९२७ दलघमी पाणीसाठा होऊन ८ हजार ३५२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण
झाल्याचे ना. चव्हाण म्हणाले.
लोकप्रतिनिधी
व प्रशासन यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात विक्रमी ८३० कोटी १४ लक्ष रुपये पिक
कर्ज वितरीत झाले. सुमारे १ लक्ष ८ हजार शेतकऱ्यांना पिक कर्जाचा लाभ मिळाला आहे.
२४ हजार ८५२ शेतकऱ्यांच्या पिक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. त्यामुळे
शेतकऱ्यांना पेरणीच्या कामाला वेळेवर पैसे उपलब्ध होऊ शकले. गतवर्षी १५
ऑगस्टपर्यंत ७२ हजार १५९ शेतकऱ्यांना ५३५ कोटी २० लक्ष रुपये कर्ज वितरीत करण्यात
आले होते. या तुलनेत यंदा २९४ कोटी ९४ लक्ष रुपये अधिक कर्ज वितरीत झाले आहे.
लाभार्थी शेतकरी संख्येत सुद्धा ३५ हजार ८४१ इतकी वाढ झाली असल्याचे ना. चव्हाण
यांनी यावेळी सांगितले.
कृषी
पंपांना वीज जोडणी देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. सन २०१५-१६ मध्ये एका
वर्षात जिल्ह्यातील ५ हजार ४०७ कोटी कृषी पंपांना वीज जोडणी मिळाली आहे. प्रलंबित
वीज जोडण्या देण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. यासाठी इन्फ्रा-२ मधून १४ कोटी
५२ लक्ष रुपये, विशेष पॅकेजमधून १९ कोटी २९ लक्ष रुपये निधी प्राप्त झालेला आहे. धडक
सिंचन योजनेतून पूर्ण झालेल्या विहिरींवर कृषी पंप वीज जोडणी देण्याची कार्यवाही
गतीने सुरु आहे. या योजनेतील १ हजार ३१७ शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी आवश्यक रक्कम
भरणा केला होता. यापैकी १ हजार ३०४ कृषी पंपांना वीज जोडणी देण्यात आल्याचेही
राज्यमंत्री म्हणाले.
महात्मा
गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सन २०१६-१७ मध्ये
आतापर्यंत २५ हजार ८५३ कुटुंबांना रोजगार मिळाला आहे. यापैकी १ हजार ७२ कुटुंबांनी
१०० दिवसांपेक्षा जास्त दिवस काम केले आहे. या योजनेच्या मजुरीपोटी १८ कोटी ८४
लक्ष ७३ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून आता वैयक्तिक
लाभाच्या कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता ११ कलमी
कार्यक्रम मोहीम स्वरुपात राबविला जाणार आहे. यामुळे ही योजना लाभार्थ्यांना
फायदेशीर ठरणार असल्याचे ना. चव्हाण यांनी सांगितले.
पर्यावरणाचा
रक्षणासाठी राज्यात एकाच दिवशी २ कोटी वृक्ष लागवड करण्याची मोहीम १ जुलै २०१६
रोजी राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात एकच दिवशी सुमारे २ लक्ष ३१ हजार
रोपांची लागवड करण्यात आली. कारंजा तालुक्यातील भामदेवी गावातील सर्व नागरिकांनी
एकत्र येऊन या मोहिमेत सहभाग घेतला. प्रत्येक नागरिकाच्या नावे एक याप्रमाणे २ हजार
५०० रोपांची लागवड याठिकाणी करण्यात आली आहे. जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी या
उपक्रमाबद्दल नागरिकांचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून
जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या २ कोटी रुपये विशेष निधीतून भामदेवी गावाचा
सर्वांगीण विकास करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये जलसंधारण, वृक्ष
संवर्धन यासह कृषी व कृषी पूरक विकासावर भर देण्यात येणार असल्याचे ना. चव्हाण
म्हणाले.
येत्या २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान
राज्यात ‘स्वच्छ
महाराष्ट्रासाठी १८ लाख भेटी’ हा उपक्रम राबविण्यात येणार
आहे. या अंतर्गत राज्यातील शौचालये नसलेल्या १८ लाख कुटुंबांपर्यंत पोहोचून
त्यांना शौचालय बांधण्यास प्रेरीत केले जाणार आहे. २०१६-१७ या वर्षात ही १८ लाख
शौचालये बांधण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी विविध प्रकारचे प्रबोधनात्मक
कार्यक्रम, गृहभेटी, आयईसी कार्यक्रम,
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शौचालयाच्या आवश्यकतेविषयी जनजागृती,
असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी,
जिल्हा परिषद, पंचायत समित्या, स्वयंसेवी संस्था, कलाकार आदींच्या सहभागातून या
अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप देऊन, लोकांपर्यंत शौचालयाचे महत्व पोहोचविण्यात
यावे. महात्मा गांधी जयंती दिनी म्हणजे २ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात ‘महास्वच्छता दिन’ साजरा करुन या मोहीमेला अधिक
गतिमान करण्यात यावे. या मोहीमेत सर्वांनी आपला सक्रीय सहभाग देऊन आपला जिल्हा
हागणदारीमुक्त करण्याच्या मोहीमेला गती द्यावी, असे आवाहनही
राज्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी केले.
जिल्ह्यातील
रस्ते विकासालाही गती मिळाली आहे. केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी
यांच्या उपस्थितीमध्ये ६ हजार ७९१ कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामाचे कोनशीला
अनावरण करण्यात आले आहे. यामध्ये वाशिम शहरातील दोन रेल्वे उड्डाण पुलांचाही
समावेश आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची निर्मिती
होणार आहे. या महामार्गाचा १०० किलोमीटर लांबीचा टप्पा वाशिम जिल्ह्यातून जात आहे.
या महामार्गावर जिल्ह्यात तीन ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रांची उभारणी होणार आहे.
त्यामुळे कृषी, औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या
संधी निर्माण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अवयवदान
हे एक महान कार्य आहे. सध्या नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवी अवयव
प्रत्यारोपण करणे शक्य आहे. याद्वारे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहेत.
राज्यात सध्या सुमारे १२ हजार पेक्षा अधिक नोंदणीकृत रुग्ण अवयव मिळण्याच्या
प्रतीक्षेत आहेत. यामध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. या रुग्णांना पुनर्जीवन
देण्याच्या दृष्टीकोनातून अवयवदानाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
याकरिता राज्य शासनाच्या वतीने दिनांक ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधी महा
अवयवदान अभियान राबविले जाणार आहे. आपण सर्वांनी या अभियानात सहभागी होऊन
अवयवदानासाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहनही ना. चव्हाण यांनी यावेळी केले.
जलयुक्त
शिवार अभियान, स्वच्छ भारत मिशन व २ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी
करणारे पाधाधिकारी, अधिकारी, ग्रामपंचायती यांच्यासह स्काऊटर व गाईडर, विविध
गुन्ह्यांच्या तपासात उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन मोहन शिरसाट यांनी केले.
*****
Comments
Post a Comment