‘लॅण्ड पुलिंग मॉडेल’मुळे मिळणार शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी


·         जिल्हाधिकाऱ्यांनी साधला पत्रकारांशी संवाद
·         महाराष्ट्र समृद्धी महामार्गाविषयी सादरीकरण
·         विकास कामांमध्ये भागीदारीमुळे होणार फायदा
·         युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार
वाशिम, दि. २६ :  महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग (सुपर कम्युनिकेशन हाय-वे) निर्मितीसाठी ‘लॅण्ड पुलिंग मॉडेल’ने शेतकऱ्यांनी आपली जमीन उपलब्ध करून दिल्यास त्यांना भूसंपादनाच्या इतर पद्धतींपेक्षा सर्वाधिक मोबदला मिळणार आहे. तसेच यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची सोय होणार असून शेतकऱ्यांसाठी ‘लॅण्ड पुलिंग मॉडेल’ अधिक फायदेशीर ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले. महाराष्ट्र समृद्धी महामार्गाविषयी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात पत्रकार बांधवांशी संवाद साधताना ते बोलत होते.
 याप्रसंगी भूसंपादन अधिकारी अनिल खंडागळे, वाशिमचे उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.
जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले की, नागपूर ते मुंबई दरम्यान तयार होणारा ७१० किलोमीटर लांबीचा हा प्रशस्त द्रुतगती मार्ग हा केवळ रस्ता नसून राज्यात नव्याने विकसित होत असलेल्या २४ कृषी समृद्धी केंद्रांना म्हणजेच नवनगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग आहे. हा महामार्ग वाशिमसह १० जिल्ह्यामधून जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ३४ ग्रामीण जिल्ह्यांपैकी २४ जिल्हे जोडले जाणार असून नागपूर ते मुंबई हा प्रवास केवळ ६ तासात करता येणार आहे. या मार्गावर ज्या ठिकाणी राज्य मार्ग, राष्ट्रीय मार्ग द्रुतगती मार्गाला छेदून जाईल, अशा २४ ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रे विकसित केली जाणार असून त्यांचा स्मार्ट सिटीप्रमाणे विकास केला जाणार आहे. या केंद्रांमध्ये सार्वजनिक सेवा, शैक्षणिक सुविधा, वैद्यकीय सुविधासह विविध २१ सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यापैकी सर्वात महत्त्वाचे कृषी समृद्धी केंद्र हे मालेगाव तालुक्यात होणार आहे.
वाशिम जिल्ह्यात मालेगाव, शेलूबाजार व कारंजा लाड या तीन ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रे विकसित केली जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी ‘लॅण्ड पुलिंग मॉडेल’द्वारे आपली जमीन द्रुतगती मार्गासाठी उपलब्ध करून दिली आहे. अशा शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या २५ ते ३० टक्के विकसित जमीन कृषी समृद्धी केंद्रामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना कायम स्वरूपी शाश्वत उत्पन्नाची हमी मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांना १० वर्षांपर्यंत प्रत्येक वर्षी प्रति हेक्टरी जिरायती क्षेत्राला ५० हजार रुपये व बागायती क्षेत्राला १ लक्ष रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक वर्षी १० टक्के वाढ केली जाईल, असे जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले.
कृषी समृद्धी केंद्रांमध्ये कृषी व कृषी पूरक उद्योग व इतर औद्योगिक विकास होणार आहे. त्यामुळे प्रत्येक कृषी समृद्धी केंद्रामध्ये किमान २० ते २५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच या द्रुतगती मार्गामुळे जिल्ह्याच्या दळण-वळण सुविधेचा विकास होऊन पर्यायाने जिल्ह्याचा विकासला हातभार लागेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.  यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी ‘लॅण्ड पुलिंग मॉडेल’विषयी सविस्तर माहिती देऊन त्यामुळे शेतकऱ्यांना
होणारे विविध फायदे सांगितले. तसेच भूसंपादन कायद्याने मिळणारी भरपाई व ‘लॅण्ड पुलिंग मॉडेल’मुळे मिळणारा मोबदला यामधील फरक आकडेवारीसह स्पष्ट केला.
‘लॅण्ड पुलिंग मॉडेल’ची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन
‘लॅण्ड पुलिंग मॉडेल’ हे शेतकऱ्यांच्या दृष्टिने अतिशय फायदेशीर असून यामुळे द्रुतगती मार्गासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची सुविधा निर्माण होणार आहे. मात्र याबाबत वस्तुनिष्ठ माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नसल्याने त्यांच्या मनात संभ्रम आहे. त्यामुळे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामध्ये जिल्ह्यातील ज्या गावांमधील शेतकऱ्यांचा जमीनी घेण्यात येणार आहेत, त्या गावांमध्ये जाऊन ‘लॅण्ड पुलिंग मॉडेल’मुळे शेतकऱ्यांचा होणारे फायदे समजावून सांगितले जात आहेत. तसेच याबाबत शेतकऱ्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करण्यात येत आहे. ‘लॅण्ड पुलिंग मॉडेल’चे फायदे लक्षात आल्यानंतर शेतकरी स्वतःहून जमिनी देण्यासाठी तयार होतील.  प्रसारमाध्यमांनीही ‘लॅण्ड पुलिंग मॉडेल’बाबतची वस्तुनिष्ठ माहिती व त्यामुळे होणारे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे