नागरिकांना समाधानकारक सेवा देण्यासाठी तत्पर रहा - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी
·
महसूल दिनानिमित्त
विशेष कार्यक्रम
·
उत्कृष्ट अधिकारी,
कर्मचारी यांचा सन्मान
वाशिम, दि. ०१ : महसूल विभाग हा सर्व प्रशासकीय विभागांमध्ये महत्त्वाचा विभाग मानला जातो.
त्यामुळे या विभागाकडून नागरिकांना खूप अपेक्षा आहेत. प्रत्येक व्यक्तीला समाधानकारक
सेवा देण्यासाठी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नेहमी तत्पर राहिले
पाहिजे, असे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले. महसूल दिनानिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी
अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, रोहयोचे
उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल
खंडागळे, मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, जिल्हा नियोजन अधिकारी
सुरेंद्र गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
द्विवेदी म्हणाले कि, प्रशासकीय सेवेमध्ये प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या
सेवेचे प्रयोजन लक्षात घेऊन काम केले पाहिजे. तसेच या सेवेचे नियम, कायदे याविषयी माहिती
घेऊन त्यानुसार आपले काम करण्याची आवश्यकता असते. नागरिकांना अधिकाधिक गतिमान व वेळेवर
सेवा देण्यासाठी सर्वांनी कटिबध्द राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी
सांगितले.
अपर
जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे म्हणाले कि, महसूल दिनाच्या निमित्ताने उत्कृष्ट
कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रत्येकवर्षी सन्मानित केले जाते. या
अधिकारी, कर्मचाऱ्यांपासून प्रेरणा व आदर्श घेऊन प्रत्येकाने आपल्या कामगिरीत
सुधारणा केली पाहिजे.
यावेळी
मालेगावच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी
द्विवेदी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मालेगाव तहसीलदार व मालेगाव
नगरपंचायती प्रशासक म्हणून त्यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना सन्मानित
करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना शाखेचे अव्वल कारकून सुनील
घोडे, गृह शाखेचे कनिष्ठ लिपिक धनंजय कांबळे, मंडळ अधिकारी श्याम जोशी, मालेगाव
तालुक्यातील तलाठी डी. ए. घुगे, शिपाई विलास चव्हाण, कोतवाल कौसर पठाण यांचाही
यावेळी सन्मान करण्यात आला.
सर्वप्रथम
निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी
महसूल दिन तसेच दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०१६ या कालावधीत राबविण्यात येत
असलेल्या महसूल सप्ताहबाबत माहिती दिली. उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्राप्त
तहसीलदार सोनाली मेटकरी, मंडळ अधिकारी श्याम जोशी यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त
केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गावंडे यांनी केले, तर आभार रवी हटकर यांनी
मानले.
*****
Comments
Post a Comment