रानभाजी महोत्सव ,वाशिम शेती शिल्प कृषी विपणन विक्री केंद्राचे उद्घाटन व वत्सगुल्म स्मार्ट पीक पेरणी स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न ;शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे



रानभाजी महोत्सव ,वाशिम शेती शिल्प कृषी विपणन विक्री केंद्राचे उद्घाटन व वत्सगुल्म स्मार्ट पीक पेरणी स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न ;

शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी 
      पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे 

वाशिम, दि. १४ ऑगस्ट (जिमाका) शेतकरी हा आपल्या कृषी संस्कृतीचा आत्मा आहे. त्यांच्या श्रमामुळेच राज्याची अर्थव्यवस्था बहरते. नाविन्यपूर्ण शेती पद्धती, सेंद्रिय शेती, आणि तंत्रज्ञानाचा वापर यांचा संगम घडवून अधिक उत्पादनक्षमता साध्य करणे हे आजच्या काळाची गरज आहे. शासनाच्या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात मी कायम त्यांच्या पाठीशी उभा राहीन, असे प्रतिपादन कृषीमंत्री तथा पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांनी केले.
      वाशिम शहरातील स्व. बाळासाहेब ठाकरे प्रशिक्षण केंद्र काटा रोड येथे १४ ऑगस्ट २०२५ रोजी रानभाजी महोत्सव वाशिम शेती शिल्प कृषी विपणन विक्री केंद्राचे उद्घाटन व वत्सगुल्म स्मार्ट पीक पेरणी स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा या विविध कृषी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.
     वत्सगुल्म स्मार्ट पेरणी स्पर्धेत सहभागी शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण व शास्त्रशुद्ध पेरणी पद्धतीचा अवलंब करून उत्पादनक्षमतेत वाढ साधली.विजेत्या शेतकऱ्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी आ. किरणराव सरनाईक, बाबुसिंग महाराज राठोड, श्याम खोडे, सई डाहाके, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार निलेश पळसकर, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा अनिसा महाबळे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, कृषी विकास अधिकारी अभिजित देवगीरकर आदी उपस्थित होते.
      जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिसा महाबळे यांनी प्रास्ताविक केले. कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम, शाश्वत शेती तंत्रज्ञानाचा प्रसार आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आयोजित वत्सगुल्म स्मार्ट पेरणी स्पर्धा खरीप २०२५ या उपक्रमाचा पारितोषिक वितरण सोहळा आज भव्य उत्साहात पार पडत आहे, याचा अत्यंत आनंद आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे आणि या उपक्रमासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करते, अश्या त्या यावेळी म्हणाल्या.
      कार्यक्रमात जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव, वाशिम शेती शिल्प कृषी विपणन, सेंद्रीय शेती उत्पादन विक्री, डेअरी उत्पादन विक्री, वत्सगुल्म स्मार्ट पीक पेरणी स्पर्धा, तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नती योजना अंतर्गत उत्पादन विक्री यांसारख्या उपक्रमांचा समावेश होता.
      या महोत्सवामुळे शेतकरी, महिला बचतगट, कृषी उद्योजक आणि स्थानिक उत्पादक यांना थेट बाजारपेठ मिळाली. रानभाज्यांचे पोषक मूल्य, स्थानिक परंपरा आणि सेंद्रिय शेतीचे महत्त्व याबाबत जागरूकता निर्माण झाली. दरम्यान कृषी संकुल परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
     कार्यक्रमाला कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर यांनी केले.


Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित