महसूल प्रशासन हे जनतेच्या दारात न्याय आणणारे व्यवस्थापन आहे उपविभागीय अधिकारी वैशाली देवकरवाशिम तहसील कार्यालयात विविध योजनांचे आदेश व दाखल्यांचे लाभार्थ्यांना वितरण


महसूल प्रशासन हे जनतेच्या दारात न्याय आणणारे व्यवस्थापन आहे
     उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर

वाशिम तहसील कार्यालयात विविध योजनांचे आदेश व दाखल्यांचे लाभार्थ्यांना वितरण

वाशिम, दि. ३ ऑगस्ट (जिमाका) 
महसूल विभाग हा शासनाच्या कार्यपद्धतीतील महत्त्वाचा कणा आहे. सामान्य जनतेच्या संपर्कात सर्वाधिक वेळ येणाऱ्या या विभागाची जबाबदारी मोठी असून त्यातून जनतेचा शासनावरचा विश्वास दृढ होतो.
     महसूल सप्ताह निमित्ताने आपण विविध योजनांचे आदेश, दाखले, सनद आणि मंजुरी पत्रकांचे वाटप करत आहोत. हे वाटप ही केवळ कागदांची देवाणघेवाण नसून, ही लोककल्याणाच्या दृष्टीने एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. शासनाच्या योजना खऱ्या अर्थाने सामान्यांपर्यंत पोहोचत आहेत, हेच याचे प्रतिबिंब आहे.असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी  वैशाली देवकर यांनी केले.
१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट हा महसूल सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. या सप्ताहाअंतर्गत २ ऑगस्ट २०२५ रोजी तहसील कार्यालय, वाशिम येथील नवीन सभागृहामध्ये पात्र लाभार्थ्यांना योजना निहाय आदेश व कागदपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
    आरडीसी घुगे म्हणाले आज महसूल दिनाच्या निमित्ताने आपण विविध योजनांचे आदेश, दाखले, सनद आणि मंजुरी पत्रकांचे वाटप करत आहोत. हे वाटप ही केवळ कागदांची देवाणघेवाण नसून, ही लोककल्याणाच्या दृष्टीने एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. शासनाच्या योजना खऱ्या अर्थाने सामान्यांपर्यंत पोहोचत आहेत, हेच याचे प्रतिबिंब आहे. आपल्या सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी नेहमीच पारदर्शक, तत्पर व उत्तरदायी सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर लवकरात लवकर योग्य निर्णय देणे हे आपले कर्तव्य आहे.
      महसूल सप्ताह हे केवळ एक औपचारिकता न राहता, कामात नवी ऊर्जा देणारा टप्पा असावा. प्रत्येक कर्मचाऱ्याने हे संकल्पपूर्वक आत्मसात करावे आणि लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण करावा.
यावेळी तहसीलदार निलेश पळसकर आदी उपस्थित होते.
      वाशिम तालुक्यातील ६ नागरिकांना २०११ पूर्वीचे अतिक्रमण, जे निकषात बसले आहेत, ते नियमअनुकूल करून सनदांचे वाटप करण्यात आले. ४७ प्रकरणांमध्ये पोटखराब (वर्ग-अ) क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्रामध्ये रूपांतरित करून (क.जा.प.) सातबारा वितरित करण्यात आले. ५ नागरिकांना अ.पा.क. पिक कर्ज मंजुरी प्रकरणांचे आदेश वितरित करण्यात आले.
भूसंपादन कलम २८ अन्वये वाढीव मोबदला प्रकरणांमध्ये ७ लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे आदेश वितरित करण्यात आले. शासन निर्णय दि. ०२/०३/२०१९, ०८/०३/२०१९, १६/०३/२०२४ व १५/०५/२०२५ अन्वये भोगवटदार वर्ग-०२ मधून वर्ग-०१ मध्ये रूपांतरित करण्याचे आदेश.
सिलींग कायद्याअंतर्गत भोगवटदार वर्ग-२ शेतजमीन विक्रीसाठी परवानगी आदेश.
महाराष्ट्र तुकडे बंदी अधिनियम, १९४७ अंतर्गत भोगवटदार वर्ग-०१ शेतजमीन विक्री परवानगी आदेश.
शासन निर्णय दि. ०२/०३/२०१९ नुसार धारणाधिकार ‘ब’ जागा विक्रीस परवानगी आदेश.
शासन निर्णय दि. १६/०६/२०१६ व दि. २६/०६/२०१८ नुसार धारणाधिकार ‘ब’ जागेचे गहाणखत करून कर्ज काढणीस परवानगी आदेश. याशिवाय संगायो / श्रावणबाळ लाभार्थी मंजुरी आदेश, नवीन मतदार कार्ड, रेशनकार्ड, जातीचे दाखले, रहिवासी दाखले आदी प्रकारच्या दाखल्यांचेही वितरण करण्यात आले.
      कार्यक्रमाला उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. संचालन कैलास देवळे व माधवराव शिंदे यांनी केले, तर आभार पि. यु. मापारी यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित