पोहरादेवी येथील धार्मिक स्थळांना पालकमंत्र्यांची भेट; तीर्थस्थळ विकास आराखड्याचा ना. दत्तात्रय भरणे यांनी घेतला आढावा

पोहरादेवी येथील धार्मिक स्थळांना पालकमंत्र्यांची भेट; तीर्थस्थळ विकास आराखड्याचा ना. दत्तात्रय भरणे यांनी घेतला आढावा

वाशिम, दि. १४ ऑगस्ट (जिमाका) जिल्ह्यातील बंजारा समाजाचे ‘काशी’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध पोहरादेवी तीर्थक्षेत्र पर्यटनदृष्ट्या आकर्षक आणि नागरिकांसाठी सुविधायुक्त करण्यासाठी विकास आराखड्याचा आढावा आज घेण्यात आला. या बैठकीत कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी तीर्थक्षेत्राचा धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपत विकास कामे गतीमान करण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीला आमदार बाबूसिंग महाराज राठोड, सई डहाके, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, उप वनसंरक्षक अभिजित वायकोस, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, कार्यकारी अभियंता शुभम जोशी, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री ना. भरणे म्हणाले की, श्री संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र विकास योजना तसेच उमरी आणि पोहरा देवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रस्तावित कामे मार्गी लावावीत. निधीअभावी प्रलंबित असलेल्या कामांसाठी शासनस्तरावर बैठक घेऊन निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. “बंजारा विरासत ही अत्यंत सुंदर व भव्य असून तिची जपणूक करणे आपली जबाबदारी आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पार्किंग व्यवस्था, भक्तनिवास, प्रकाशयोजना, हरितकरण व सुरक्षा आदी सुविधांचा आढावा घेण्यात आला. विकास आराखड्यातील कामांची गती वाढवून विभागांमध्ये समन्वय साधावा, निधीचा पारदर्शक व गुणवत्तापूर्ण वापर करावा, आणि पोहरा हे राज्यातील आदर्श तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

बैठकीपूर्वी पालकमंत्री ना. भरणे यांनी जगदंबा माता दर्शन घेतले. त्यानंतर, श्री संत सेवालाल महाराज समाधी व मंदिर पाहणी, रामराव महाराज आश्रम व बाबनलाल महाराज यांचे दर्शन घेतले. आमदार बाबूसिंग महाराज राठोड यांनी पालकमंत्री यांचा सत्कार केला.
0000000

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर