सॉर्टींग व पॅकेजिंग युनिटचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन> माती लॅबची केली पाहणी> अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेला दिली सदिच्छा भेट
- Get link
- X
- Other Apps
सॉर्टींग व पॅकेजिंग युनिटचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन
> माती लॅबची केली पाहणी
> अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेला दिली सदिच्छा भेट
वाशिम,दि.१४ ऑगस्ट (जिमाका): मानव विकास मिशन तालुका स्पेसिफिक कार्यक्रम सन २०२३-२४ अंतर्गत, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), वाशिम यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कलर सॉर्ट्रेक्स, प्रिंटिंग व पॅकेजिंग युनिटचे बाभूळगाव येथे उद्घाटन तसेच मौजे साखरा (ता. वाशिम) येथील डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत पंढरीनाथ जैविक शेतकरी उत्पादक कंपनी येथे उभारलेल्या माती लॅब सेंटर नैसर्गिक निविष्ठा निर्मिती केंद्र) व सामूहिक सुविधा केंद्राचे लोकार्पण राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांनी केले.
याप्रसंगी बोलताना पालकमंत्री श्री.भरणे म्हणाले, शेतमालाला योग्य दर मिळवून देण्यासाठी प्रक्रिया उद्योगांची साखळी ग्रामीण भागात निर्माण होणे आवश्यक आहे. सॉर्टींग व पॅकेजिंग युनिटमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे वर्गीकरण, दर्जानुसार पॅकेजिंग आणि थेट विक्रीची सुविधा मिळणार आहे. यामुळे शेतीला व्यावसायिक दिशा मिळेल व रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल.
उद्घाटनानंतर पारंपरिक शेती इनपुट निर्मिती, सेंद्रिय खत तयार करण्याच्या पद्धती, नैसर्गिक कीडनियंत्रण उपाय आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शाश्वत शेतीची अंमलबजावणी याबाबतची सविस्तर माहिती पालकमंत्र्यांनी जाणून घेतली.पंढरीनाथ जैविक शेतकरी उत्पादक कंपनीचे सर्व संचालक मंडळ व सदस्य यांच्या बीआरसी केंद्रात सध्या ४५ पेक्षा अधिक नैसर्गिक निविष्ठा प्रकार तयार केले जात आहेत. यात जीवामृत, गोकृपा अमृत, ह्युमिक अॅसिड, अग्निअस्त्र, ब्रह्मास्त्र, अंडेजनित अमिनो अॅसिड, विविध वनस्पती अर्क व पावडर, ट्रायकोडर्मा, मायकोरायझा, सीपीपी, नाडेप, वर्मीकंपोस्ट, बायोडायनॅमिक कंपोस्ट आदींचा समावेश आहे.संपूर्ण प्रक्रिया नैसर्गिक शेती पद्धतीवर आधारित असून, एकही निविष्ठा किंवा मजूर बाहेरून घेतले जात नाहीत. खरीप हंगामासाठी बीडी कंपोस्ट बेडही तयार करण्यात आले आहेत.प्रथम टप्प्यातील या कंपन्यांच्या यशस्वी मॉडेलच्या प्रेरणेने वाशिम जिल्ह्यात एकूण २५ जैविक शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात आल्या असल्याची माहिती श्रीमती महाबळे यांनी दिली.
यानंतर ना.श्री भरणे यांनी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा, साखरा येथेही सदिच्छा भेट देत संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांची व पायाभूत सुविधांची पाहणी केली. गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाधारित अध्यापन, खेळ व सांस्कृतिक उपक्रम यांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला. पालकमंत्र्यांनी शाळेच्या प्रगत सुविधांचे कौतुक करत, ग्रामीण भागात आधुनिक व सर्वांगीण शिक्षण पोहोचविण्यासाठी शिक्षक व व्यवस्थापनाच्या प्रयत्नांचे अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले, आज वाशिम जिल्ह्याच्या दौ-यावर असताना एका आगळ्या वेगळ्या व शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या जिल्हा परिषद शाळेला भेट देण्याचा योग आला. मनापासून सांगतो, ही जिल्हा परिषदेची शाळा पाहून खरंच भारावून गेलो. लोकसहभाग, प्रशासनाची साथ आणि शिक्षकांची मेहनत असेल तर जिल्हा परिषदेची शाळा सुद्धा इंटरनॅशनल होऊ शकते, हे आज अनुभवता आले. जिल्हा परिषदेच्या या शाळेत प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी वेटिंग लिस्ट लागते, हीच या शाळेच्या यशाची पोच पावती होय.
या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, कृषी व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती लाभली.सदिच्छा भेटीच्या निमित्ताने परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment