लोकांच्या मनात घर करण्याची संधी: सीईओ वसुमना पंत

लोकांच्या मनात घर करण्याची संधी:  सीईओ  वसुमना पंत

अमृत महा आवास अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

 

वाशिम, दि. 8 डिसेंबर

ग्रामिण भागातील बेघर आणि गरीब कुटुंबांना शासनाच्या योजनेमधुन घरकुल बांधुन देण्याच्या कामाची महत्वाची जबाबदारी आपल्यावर आहे. जबाबदारी ऐवजी ही एक मोठी संधी मिळाली असे समजुन काम केल्यास लोकांचे घरकुल तर होईलच पण त्यांच्या मनात कायम घर करुन रहाल अशा शब्दात मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अमृत महा आवास अभियान 2022-23 अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना त्यांनी आपले विचार व्यक्त केले.

जिल्हा परिषदेच्या म. फुले सभागृहात (दि. ६ ) संपन्न झालेल्या एक दिवशीय कार्यशाळेला जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डिगांबर लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत “अमृत महा आवास अभियान 2022-23” राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

पुढे बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी पंत म्हणाल्या स्वत:चे पक्के घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. घरकुलाच्या माध्यमातुन हजारो ग्रामिण कुटुंबाचे हे स्वप्न पुर्ण होत आहे. आपण याकामी आत्मीयतेने काम केल्यास घरकुल तर तयार होईलच मात्र लोकांच्या मनातही  तुमच्या विषयी आपुलकी भावना निर्माण होईल. लोकांच्या मनात घर करण्याची ही एक संधीच आहे. त्यामुळे घरकुलाचा लाभ देतांना कोणाही लाभार्थ्यास त्रास होणार नाही आणि त्यांना वेळेत हप्ते मिळतील याची खबरदारी घेण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या. यापुढे घरकुलासंदर्भात कोणतीही तक्रार आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे संकेतेही त्यांनी  या कार्यशाळेत दिले.

 कार्यशाळेच्या सुरुवातीला प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांनी ग्राम‍ विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार महा आवास योजना राबविण्याची उद्दिष्टये, त्या अंतर्गत राबवावयाचे उपक्रमांबाबत प्रस्ताविकातुन माहिती दिली. सर्वांसाठी घरे-2024 या शासनाच्या धोरणानुसार अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना,आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार योजना,यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशा विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता आणने हा या अभियाना हेतू असल्याचे कोवे यांनी सांगितले.

अभियानाची प्रमुख उद्दीष्ट्ये:

1) राज्यात गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणीचे कामास गतिमान करणे.

2) ग्रामीण गृह निर्माण योजनांमध्ये शासकिय यंत्रणा व पंचायत राज संस्थासोबत समाजातील सर्व घटक जसे-स्वयंसेवी संस्था (लॉयन्स क्लब, रोटरी क्लब, इ.), सहकारी संस्था, खाजगी संस्था, तंत्र शिक्षण संस्था, बँका, लोकप्रतिनिधी, लाभार्थी, ग्रामस्थ, इ.यांचा सक्रीय सहभाग वाढविणे.

3) ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रातील भागधारकांची क्षमताबांधणी व जन-जागृतीद्वारे लोकचळवळ उभी करणे.

4) योजनांमधील लाभार्थ्यांचे जिवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा कृतीसंगम (कन्वर्जेंस) घडवून आणणे.

5) ग्रामीण  गृहनिर्माण क्षेत्रामध्ये नाविन्यपुर्ण उपक्रम राबवून घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढविणे.

 

“अमृत महा आवास अभियान 2022-23” अंतर्गत राबवावयाचे उपक्रम :

भुमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे.

घरकुलांना उद्दिष्टांप्रमाणे 100 टक्के मंजूरी देणे.

मंजूर घरकुलांना सर्व हप्ते वेळेत वितरित करणे.

सर्व मंजूर घरकुले भौतिकदृष्टया पुर्ण करणे.

प्रलंबित घरकुले (Delayed Houses) पुर्ण करणे.

ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पुर्ण करणे.

इंदिरा आवास योजनांतर्गत उर्वरित सर्व घरकुले पुर्ण करणे व क्षेत्र अधिकारी ॲप वापरणे.

सामाजिक लेखापरिक्षण वेळेत करणे.

शासकिय योजनांशी कृतीसंगम करणे.

नाविन्यपुर्ण उपक्रम (इनोव्हेशेन्स/ बेस्ट प्राक्टिसेस) राबविणे. 

 

कार्यशाळेला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे सहायक प्रकल्प संचालक सचिन  गटलेवार, वामिश व मानोरा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बालासाहेब बायस, कारंता व मंगरुळपीर गट विकास अधिकारी शालीकराम पडघन, मालेगाव गट विकास अधिकारी किशोर काळपांडे, रिसोड गट विकास अधिकारी दिपकसिंग साळुंके,  महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे गट विकास अधिकारी रविंद्र सोनोने, कनिष्ठ प्रशासन अधिकारी दिपक गोपाळराव देशमुख, या अभियानाच्या प्रोगामर अश्विनी उजवणे यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा वाशिम अंतर्गत अधिकारी व कर्मचारी, जिल्हा व तालुका स्तरावरील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

***

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे