अपघात प्रवण क्षेत्र शोधून जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा -षण्मुगराजन एस. जिल्हा रस्ता सुरक्षा समिती सभा संपन्न
- Get link
- X
- Other Apps
अपघात प्रवण क्षेत्र शोधून जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा
जिल्हा रस्ता सुरक्षा समिती सभा संपन्न
वाशिम, दि. 01 (जिमाका) : जिल्हयातून राष्ट्रीय व राज्य महामार्ग आणि जिल्हा मार्ग जातात. जिल्हयातील या मार्गांचे सर्वेक्षण करुन अपघात प्रवणक्षेत्र शोधून संबंधित विभागाने उपाययोजना करून आवश्यक त्या ठिकाणी गतीरोधक बसविण्याची कार्यवाही करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी दिले.
नुकतीच जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची सभा श्री. षण्मुगराजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्यंकट मिठेवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.विजय काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कोरे, सहायक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सैय्यद, वाशिम नगर परिषदचे मुख्यधिकारी दीपक मोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
10 नोव्हेंबर 2022 रोजी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये जिल्हयातील अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले. त्या अनुषंगाने जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची सभा नुकतीच जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
श्री.षण्मुगराजन म्हणाले, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दयावी. गतीरोधक दर्शविणारे फलक लावून रस्त्यांवर असलेले खड्डे बुजविण्याचे काम प्राधान्याने करावे. संबंधित यंत्रणांनी रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना समन्वयातून कराव्यात असे त्यांनी सांगितले.
श्री.षण्मुगराजन म्हणाले, महामार्ग पोलीसांनी अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या वाहन चालकाची अनुज्ञप्ती जप्त करुन अशा अनुज्ञप्ती धारकांच्या अनुज्ञप्तीचे निलंबन करण्यासाठी परिवहन विभागाकडे पाठवावे. परिवहन विभागाने पोलीस विभागाकडून प्राप्त झालेल्या अनुज्ञप्तीचे निलंबन करावे, अशा सूचना पोलीस व परिवहन विभागांना दिल्या. वाशिम शहरातील सर्व पाच सिग्नल कार्यान्वीत राहतील याकडे नगरपालिका व वाहतूक शाखेने लक्ष दयावे. वाहन चालवितांना हेल्मेट व सिटबेल्ट नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. वाहतूक नियम व रस्ता सुरक्षा विषयकबाबींचा समावेश असलेल्या कार्यशाळेचे आयोजन शालेयस्तरावर करावे, जेणेकरुन शालेय विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत माहिती होईल. रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती होण्यासाठी रोड सेफ्टी पेट्रोलमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून 26 जानेवारी, 15 ऑगस्ट या राष्ट्रीय सणाच्या दिवशी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात यावे. पोलीस व परिवहन विभागांनी शालेय बस वाहन चालक व मालकांची बैठका घ्याव्यात.असे त्यांनी सांगितले.
श्री. हिरडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा परिषद व नगरपालिका यांनी त्यांच्या अधिपत्याखालील असणाऱ्या रस्त्यांवर वेगमर्यादा दर्शविणारे तसेच मोटार वाहन कायद्याने विहीत केलेल्या आदेश दर्शक चिन्ह, इशारा दर्शक चिन्ह व माहिती दर्शक चिन्हे यांची उभारणी करावी. राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक अनधिकृतपणे तोडले असल्यास ते तात्काळ बंद करुन त्यावर सातत्याने निगरानी व उपाययोजना करुन सार्वजनिक बांधकाम विभाग,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नगरपालिका, पोलीस विभागाने व राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियमानुसार आवश्यक दंडात्मक कार्यवाही करावी.असे ते म्हणाले.
सभेला राष्ट्रीय महामार्ग वाशिमचे प्रकल्प संचालक, महामार्ग पोलीस अमानीचे पोलीस निरीक्षक, औरंगाबाद येथील राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अमरावतीचे उपविभागीय अधिकारी यांची उपस्थिती होती.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment