सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ

सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त

ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ

वाशिम, दि. 07 (जिमाका) : सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त ध्वजदिन 2022 निधी संकलनाचा शुभारंभ आज 7 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांना सशस्त्र सेना ध्वज लावून करण्यात आला. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक नरेंद्र वाघमारे यांनी श्री. हिंगे यांना सशस्त्र सेना ध्वज लावला.

स्वातंत्र्याची अमर ज्योत सतत तेवत ठेऊन मातृभूमिचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे कार्य देशाच्या शूर सैनिकांचे आहे. युध्द अथवा युध्दजन्य परिस्थीतीत तसेच अतिरेकी कारवायांमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी वीरमरण आलेल्या भारतीय लष्करातील पराक्रमशील जवानांच्या बलिदानाची नागरीकांना कायम आठवण राहावी, यासाठी 7 डिसेंबर हा सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो. भारतीय शूर सैनिकांच्या ऋणाची परतफेड करण्यासाठी त्यांच्या कुटूंबियांचे/ अवलंबितांचे पुनर्वसन करण्यास ध्वजदिन निधी संकलनातून मदत करण्यात येते.

सैनिकांच्या कुटूंबियांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याकरीता लागणारा खर्च सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्त निधी संकलन करुन उभारण्यात येतो. सन 2021 या वर्षासाठी जिल्हयाला 48 लाख 53 हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हयातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, शाळा/महाविद्यालये यांच्या योगदानातून जिल्हयाने 30 लाख रुपयाचे निधी संकलन करुन 62 टक्के उद्दिष्ट पुर्ण केले आहे. सन 2022 करीता सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे जिल्हयाला 48 लाख 53 हजार रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ्‍ प्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी मानले.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे