ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारांच्या उपलब्धतेमुळे महिला बचतगटांच्या उत्पन्न वाढीस चालना मिळेल - पालकमंत्री शंभूराज देसाई

 


·        लोकसंचालित साधन केंद्रांना ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारांचे वितरण

·        महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने ऑनलाईन समारंभ

·        महिलांना शासकीय योजनांचा एकत्रित लाभ देण्यासाठी प्रयत्न

 वाशिम, दि. २६ (जिमाका) :  महिला बचतगटांच्या माध्यामतून गाव-खेड्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे आवश्यक आहे. याकरिता महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत प्रयत्न केले जात आहेत. मानव विकास कार्यक्रम अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्रांना ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारे उपलब्ध करून दिल्यामुळे महिला बचतगटांच्या आर्थिक उत्पन्न वाढीस चालना मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. आज, २६ मे रोजी मानव विकास कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ६ लोकसंचालित साधन केंद्रांना ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारांचे ऑनलाईन वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

 खासदार भावना गवळी, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, मानव विकास कार्यक्रमचे जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सोनखासकर, महिला आर्थिक महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांच्यासह लोकसंचालित साधन केंद्र व बचतगटांच्या अध्यक्ष, सदस्य या कार्यक्रमात दुरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी वाशिम, रिसोड, मालेगाव तालुक्यातील ६ लोकसंचालित साधन केंद्रांना प्रत्यकी १ ट्रॅक्टरसह ट्रॉली, रोटावेटर, पेरणीयंत्र, नांगर, पंजी, थ्रेशर, फवारणीयंत्र व नऊ फाळी आदी साहित्याचे ऑनलाईन वितरण करण्यात आले.


 पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, महिला बचतगटांचे सक्षमीकरण करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून राबविण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. मानव विकास कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील लोकसंचालित साधन केंद्रांना ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारे उपलब्ध करून दिल्यामुळे महिला बचतगटातील महिलांना अतिशय कमी दरात व कमी वेळात शेतीच्या मशागतीसाठी तसेच इतर कामांसाठी ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारे उपलब्ध होती. त्यामुळे शेतीतील उत्पन्न वाढण्यासोबतच बचतगटांच्या उत्पन्न वाढीसाठी सुद्धा हातभार लागणार आहे. महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाने यापुढेही असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. जिल्ह्यात महिला बचतगटांच्या महिलांना विविध शासकीय योजनांच्या एकत्रित लाभ देवून त्यांचे शेती, शेतीपूरक व्यवसायातील उत्पन्न वाढवून त्यांना सक्षम बनविण्यासाठी लवकरच जिल्ह्यात विशेष उपक्रम हाती घेणार पालकमंत्री यावेळी म्हणाले.

 खा. गवळी म्हणाल्या, बचतगटांच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्यास जिल्ह्याच्या विकासाला त्याचा मोठा हातभार लागेल. त्यामुळे महिला आर्थिक विकास महामंडळाने जिल्ह्यातील महिला बचतगटांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत. याकरिता ग्रामीण भागातील महिला बचत गटांची साखळी तयार करून छोटे-छोटे उद्योग सुरु करण्याचा प्रयत्न करावा, असे सांगून खा. गवळी यांनी माविमच्या कार्यालय शुभेच्छा दिल्या.

 माविमच्या अध्यक्ष श्रीमती ठाकरे म्हणाल्या, वाशिम जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत अतिशय चांगले काम होत आहे. राज्यात पहिले रुरल मार्टसुरु करून बचतगटांच्या महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम वाशिम येथे राबविण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील विविध बचतगटांच्या महिला अतिशय सक्रियपणे काम करून प्रगतीकडे वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

 श्री. नागपुरे म्हणाले, लोकसंचालित साधन केंद्र हे बचतगटांचे फेडरेशन म्हणून काम करते. या केंद्राद्वारे महिला बचत गटांना हे ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारे अत्यल्प दराने भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे महिला बचतगटातील सदस्य महिलांना शेतीच्या कामामध्ये वेळेत तसेच माफक दरात ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारे उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे श्री. नागपुरे यांनी सांगितले. नागठाणा येथील महिला बचतगटाच्या अध्यक्ष श्रीमती नंदा बायस यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश