‘म्युकरमायकोसीस’कडे दुर्लक्ष नको, वेळीच उपचार घ्या - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड
वाशिम, दि. २२ (जिमाका) : आज आपण कोविड-१९ या आजाराशी लढत असतांना
आणखी एका आजाराने काही रुग्णांना ग्रासले जात आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या काही रुग्णांमध्ये
म्युकरमायकोसीस (ब्लॅक फंगस) आजाराचा संसर्ग दिसून येत आहे. नागरिकांनी या
आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर
राठोड यांनी केले आहे.
म्युकरमायकोसीस
आजारात व्यक्तीच्या श्वसनयंत्रणेस किंवा त्वचेस संसर्ग उद्भवतो. यामध्ये प्रामुख्याने
खोकला, ताप येणे, डोकेदुखी, नाक बंद, सायनस वेदना, दातांमधे तीव्र वेदना, दात हलणे, हिरड्यांमधून पस येणे, तोंडातून दुर्गंधी येणे, टाळूवर एखादा काळा चटटा येणे, नाकातून पस येणे, डोळ्यांनी कमी दिसणे, डोळे लाल होणे, डोळ्यांची हालचाल कमी होणे, चेहऱ्यावर सूज येणे किंवा बधीरता येणे, जबड्याचे हाड
उघडे पडणे, त्वचा काळसर होणे,त्वचेवर मेदयुक्त
फोड येणे, त्वचेवर लालसरपणा येणे, शरीराला
सूज येणे, अल्सर आदी प्रकारची लक्षणे यामध्ये दिसून येतात. या
आजारामुळे प्रसंगी डोळा व जबडा गमवायची वेळसुद्धा येऊ शकते. मेंदूपर्यंत त्याचा संसर्ग
पोहोचल्यास अर्धांगवायूचा झटका किंवा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे या आजाराची
लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णालयात दाखल होणे आवश्यक आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले.
म्युकरमायकोसीस हा संक्रमित होणारा आजार नाही. संक्रमित व्यक्तीकडून तो आजार दुसऱ्या व्यक्तीला होवू शकत नाही. या प्रकारच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी स्वतःची काळजी घेणे, वैयक्तिक स्वच्छतेकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. प्रतिकारशक्ती कमी असल्यास, घराबाहेर स्वत:ला सुरक्षित ठेवणे महत्वाचे आहे. कोणत्याही ठिकाणी काम करताना मास्क घातल्यास आणि पूर्ण बरे होईपर्यंत सर्व जखमांवर नियमित मलमपट्टी करीत राहिल्यास बुरशीजन्य संसर्ग रोखणे शक्य होईल. उन्हाळ्यात आणि शरद ऋतूतील महिन्यांमध्ये अतिरिक्त सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, कारण या वातावरणात बुरशीचे प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देतांना कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा, असे आवाहनही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी केले आहे.
Comments
Post a Comment