मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून वाशिममधील १७५ शाळांचे आमूलाग्र रूपांतरण. ‘स्कूल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट’मुळे जिल्हा परिषद शाळांना गुणवत्तेचा नवा आयाम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून वाशिममधील १७५ शाळांचे आमूलाग्र रूपांतरण

‘स्कूल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट’मुळे जिल्हा परिषद शाळांना गुणवत्तेचा नवा आयाम

वाशिम, (जिमाका): राज्यातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्था खऱ्या अर्थाने सक्षम, आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण व्हावी, या दूरदृष्टीतून मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी संकल्पित केलेला ‘स्कूल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट (एसटीपी)’ वाशिम जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती घडवत आहे. ग्रामीण आणि जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनाही खासगी शाळांप्रमाणेच आधुनिक सुविधा, दर्जेदार अध्यापन आणि उज्ज्वल भविष्याच्या संधी मिळाव्यात, या मुख्यमंत्र्यांच्या ठाम भूमिकेतून हा प्रकल्प आकारास आला आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशन (एलएलएफ) यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग व जिल्हा परिषद वाशिम यांच्या समन्वयाने ८ डिसेंबर २०२१ रोजी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारा हा प्रकल्प केवळ शाळांची डागडुजी करणारा नसून, पूर्ण शाळा परिवर्तन घडविणारा सर्वसमावेशक शैक्षणिक मॉडेल ठरत आहे.
या प्रकल्पांतर्गत वाशिम जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने १७५ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांचे रूपांतर करण्यात आले आहे. पहिल्या ते चौथ्या टप्प्यात (डिसेंबर २०२१ ते नोव्हेंबर २०२५) १२५ शाळा आणि सध्या सुरू असलेल्या पाचव्या टप्प्यात (जून २०२५ ते नोव्हेंबर २०२६) आणखी ५० शाळा या प्रकल्पात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘कोणताही तालुका, कोणतीही शाळा विकासापासून वंचित राहू नये’ या धोरणानुसार जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यांमध्ये या योजनेची समतोल अंमलबजावणी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाला पायाभूत सुविधांपासून ते गुणवत्तेपर्यंत नवे परिमाण देण्याचा प्रयत्न या प्रकल्पात दिसून येतो. स्मार्ट वर्गखोल्या, डिजिटल बोर्ड, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालये, गणित व क्रीडा साहित्य, सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, तसेच सौरऊर्जेवर आधारित विद्युतपुरवठा या सर्व सुविधा शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ‘बिल्डिंग अ‍ॅज लर्निंग एड’ संकल्पनेतून शाळेच्या भिंती, जिने व परिसर हेच शिकवणारे माध्यम बनविण्यात आले असून त्यामुळे शिक्षण अधिक रंजक व अनुभवाधारित झाले आहे.
या प्रकल्पाचा आत्मा केवळ इमारतींमध्ये नाही, तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षकांचे आधुनिक अध्यापन पद्धतींवर प्रशिक्षण, विद्यार्थ्यांचे आरोग्य, खेळ, व्यक्तिमत्त्व विकास, शालेय व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण आणि पालकांचा सक्रीय सहभाग या सर्व घटकांना प्रकल्पात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शाळा केवळ शिकवण्याचे केंद्र न राहता, मुलांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र बनत आहेत.
या प्रकल्पाचा थेट लाभ वाशिम जिल्ह्यातील २५,०५५ विद्यार्थ्यांना होत असून १,०९२ शिक्षक, १७५ मुख्याध्यापक, १,४३८ शालेय व्यवस्थापन समिती सदस्य आणि ३,३७८ महिला विविध प्रशिक्षण व सहभाग उपक्रमांमुळे सक्षम होत आहेत. एकूण ३१,३१३ नागरिक या परिवर्तन प्रक्रियेचा भाग बनले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शैक्षणिक सुधारणा धोरणाची फलश्रुती म्हणून वाशिम जिल्ह्यातील १६ शाळांना ‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक तसेच अनेक तालुकास्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. दोन शाळांना आयएसओ प्रमाणपत्र मिळणे ही गुणवत्ता आणि व्यवस्थापनातील प्रगतीची ठळक साक्ष आहे.
एकूणच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला ‘स्कूल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट’ वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना केवळ सुंदरच नाही, तर सक्षम, आधुनिक आणि स्पर्धात्मक बनवत असून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भवितव्याला नवी दिशा देणारा ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित