सर्व विभागांनी शाश्वत भूजल व्यवस्थापनासाठी या वैज्ञानिक माहितीचा सक्रिय व सर्जनशील वापर करावा -जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
सर्व विभागांनी शाश्वत भूजल व्यवस्थापनासाठी या वैज्ञानिक माहितीचा सक्रिय व सर्जनशील वापर करावा
-जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
वाशिमात भूजल व्यवस्थापनावर महत्त्वपूर्ण कार्यशाळा उत्साहात
वाशिम, दि.१३ जानेवारी (जिमाका) भूजलाचा वापर वैज्ञानिक पद्धतीने करणे काळाची गरज बनली आहे. केंद्रीय भूजल मंडळाने तयार केलेले जलभृत मानचित्रण आणि सखोल अभ्यास अहवाल हे आपल्या जिल्ह्यासाठी अत्यंत मौल्यवान साधन आहे.या आधारे पाणीपुरवठा, सिंचन, पाणलोट विकास, जलसंधारण व कृषी नियोजन अधिक अचूक करता येईल. प्रत्येक विभागाने आपापल्या योजना आखताना या भूजल माहितीचा वापर केल्यास निधीचा योग्य उपयोग होईल आणि पाण्याची नासाडी टाळता येईल. सर्व विभागांनी शाश्वत भूजल व्यवस्थापनासाठी या वैज्ञानिक माहितीचा सक्रिय व सर्जनशील वापर करावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
जिल्ह्यातील जलसंपदेचे शाश्वत व वैज्ञानिक व्यवस्थापन घडवून आणण्याच्या उद्देशाने केंद्रीय भूजल मंडळ, मध्य क्षेत्र, नागपूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे एकदिवसीय महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. भूजल माहितीचा प्रसार व जलभृत मानचित्रणाचा वापर या विषयावर आधारित कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
कार्यशाळेचा उद्देश विविध विभागांतील अधिकाऱ्यांमध्ये भूजलाबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पाण्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन करणे हा होता.
कार्यशाळेत वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड, सहाय्यक भूवैज्ञानिक प्रशांत गोलंगे,कनिष्ठ भूवैज्ञानिक सौरभ मोटघरे यांच्यासह जलसंधारण विभाग, जलसंपदा विभाग, लघु सिंचन विभाग, जिल्हा परिषद सिंचन विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच कृषी विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवातीला केंद्रीय भूजल मंडळाच्या वैज्ञानिक निर्मलकुमार नंदा यांनी सादरीकरण केले. त्यानंतर वैज्ञानिक पौर्णिमा बाराहाते यांनी वाशिम जिल्ह्यासाठी राबविण्यात आलेल्या 'राष्ट्रीय जलभृत मानचित्रण व व्यवस्थापन' या संशोधन प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण सादर केले. त्यांच्या सादरीकरणात जलभृतांची रचना, भूजलाची उपलब्धता, पाण्याची गुणवत्ता तसेच भविष्यातील शाश्वत वापरासाठी आवश्यक नियोजन यांचा समावेश होता.
वैज्ञानिक निर्मलकुमार नंदा यांनी केंद्रीय भूजल मंडळ भूजल माहिती संकेतस्थळ, एकात्मिक भूजल संसाधन मापन प्रणाली तसेच जलसंपदा माहिती प्रणाली या ऑनलाइन व्यवस्थांची माहिती दिली. या प्रणालींचा वापर करून शासकीय योजनांचे नियोजन, अंमलबजावणी व मूल्यमापन अधिक परिणामकारक कसे करता येईल, याचे प्रात्यक्षिक त्यांनी सादर केले.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी कुंभेजकर म्हणाले, शासकीय यंत्रणांनी केवळ योजना राबविण्यावर न थांबता, उपलब्ध भूजल साठ्याचे संरक्षण, पुनर्भरण आणि योग्य वापर यावर भर दिला पाहिजे. शेतकरी, ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्था यांनाही या वैज्ञानिक माहितीशी जोडणे आवश्यक आहे. पाणी ही संपत्ती आहे, ती पुढील पिढ्यांसाठी जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
या प्रसंगी 'राष्ट्रीय जलभृत मानचित्रण व व्यवस्थापन – वाशिम जिल्हा' या सखोल अभ्यासपूर्ण अहवालाचे विधिवत प्रकाशन करण्यात आले. वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड यांनी भूजलावर आधारित योजना, पाणलोट विकास व सिंचन क्षेत्रातील कामांसाठी केंद्रीय भूजल मंडळाच्या अहवालांचा आणि माहितीचा प्रभावी वापर करण्याचे मार्गदर्शन केले.
कार्यशाळेनंतर झालेल्या प्रतिक्रिया सत्रानंतर वैज्ञानिक निर्मलकुमार नंदा यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment