घनकचरा विलिनीकरण प्रक्रिया केंद्राचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन
घनकचरा विलिनीकरण प्रक्रिया केंद्राचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन
वाशिम, (जिमाका) शहर स्वच्छता, पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत वाशिम येथे घनकचरा विलिनीकरण प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन आज दि.(२६) रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. 'फ्री ऑफ कॉस्ट ' तत्वावर चालविला जाणारा हा विलगीकरणाचा प्रथम प्रकल्प आहे.
यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी निलेश गायकवाड, नगरपालिका प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, स्वच्छता कर्मचारी व नागरिक मोठ्या उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री ना. भरणे यांनी केंद्राची पाहणी करून कार्यपद्धतीची राम डोरले यांच्याकडून माहिती जाणून घेतली.
पालकमंत्री म्हणाले की, घनकचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण, प्रक्रिया व पुनर्वापर केल्यास पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कमी करता येतो. हे केंद्र म्हणजे स्वच्छ भारत अभियानाला बळकटी देणारे महत्त्वाचे पाऊल असून, शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने होणार आहे.
या केंद्रामार्फत ओला व सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार असून सेंद्रिय कचऱ्यापासून खतनिर्मिती, तर पुनर्वापरयोग्य कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी होऊन स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.
जिजा ऍग्रिकल्चर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडचे संचालक राम डोरले यांनी केंद्राच्या उभारणीबाबत माहिती देताना सांगितले की, स्वच्छता व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून भविष्यात नागरिकांच्या सहकार्याने हे केंद्र आदर्श ठरेल.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नागरिकांनीही स्वच्छता राखण्याची व कचरा वेगळा करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले. घनकचरा विलगीकरण केंद्रातील काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी पालकमंत्र्यांनी यावेळी संवाद साधला.
Comments
Post a Comment