ऑपरेशन द्रोणागिरी: वाशिम जिल्ह्याच्या विकासाला नवे पंख
विशेष लेख
ऑपरेशन द्रोणागिरी: वाशिम जिल्ह्याच्या विकासाला नवे पंख
वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी अलीकडेच प्रसारमाध्यमांतून वाचले आणि ऐकले असेल की, वाशिम जिल्ह्याची निवड ‘ऑपरेशन द्रोणागिरी’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी देशातील पाच विशेष जिल्ह्यांपैकी एका म्हणून करण्यात आली आहे. हा उपक्रम काय आहे? त्याचे उद्दिष्ट काय आहे? आणि वाशिम जिल्ह्यासाठी त्याचा नेमका कसा उपयोग होणार आहे? याबाबतची माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.
ऑपरेशन द्रोणागिरी हा केवळ नावीन्यपूर्ण उपक्रम नसून, तो आपल्या जिल्ह्याला प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने एक नवे ओळख निर्माण करून देणारा उपक्रम ठरणार आहे. या संदर्भात आपण ऑपरेशन द्रोणागिरीचा उद्देश, त्यामागील विचारधारा, तसेच वाशिम जिल्ह्याच्या विकासात होणारे योगदान या सर्वांवर सविस्तर चर्चा करू.
वाशिम जिल्ह्यासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट म्हणजे, ऑपरेशन द्रोणागिरी या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (DST) डिसेंबर 2022 मध्ये सुरू केलेल्या या राष्ट्रीय जिओस्पेशियल धोरणाअंतर्गत (NGP) भारताला जिओस्पेशियल तंत्रज्ञानात जागतिक नेता बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उपक्रमाद्वारे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी, युवक आणि महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हा मुख्य हेतू आहे.
ऑपरेशन द्रोणागिरी म्हणजे काय?
ऑपरेशन द्रोणागिरी ही NGPच्या अंमलबजावणीतील पहिली टप्पा आहे, जी नोव्हेंबर 2024 ते जून 2025 दरम्यान देशातील पाच राज्यांतील सहा जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील वाशिम, उत्तर प्रदेशातील वाराणसी, हरियाणातील सोनीपत आणि गुरुग्राम, आसाममधील कामरूप, आणि आंध्र प्रदेशातील विजयनगर यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्याला विशिष्ट क्षेत्रांशी संबंधित आव्हानांसाठी पायलट प्रकल्प म्हणून निवडण्यात आले असून वाशिम जिल्ह्याला कृषी क्षेत्रात जिओस्पेशियल तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी पायलट म्हणून निवडले आहे.
वाशिम जिल्हा निती आयोगाने आकांक्षीत जिल्हा म्हणून घोषित केला आहे. याचा अर्थ असा की वाशिम हा भारतातील सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने मागासलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे, जिथे विकासाच्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. अशा परिस्थितीत ऑपरेशन द्रोणागिरी सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाधारित उपक्रमांची अंमलबजावणी जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
आकांक्षीत जिल्ह्याचा दर्जा आणि ऑपरेशन द्रोणागिरीचे महत्त्व
निती आयोगाच्या आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमाचा उद्देश शिक्षण, आरोग्य, कृषी, पायाभूत सुविधा, कौशल्यविकास, आणि आर्थिक स्थिती या क्षेत्रांत जलद प्रगती करणे आहे. वाशिमसाठी ऑपरेशन द्रोणागिरी हा कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणाचा उत्तम संधी आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान आणि उपाय उपलब्ध होतील.
वाशिम जिल्ह्यासाठी या उपक्रमाचे महत्त्व
1. कृषी विकासात गती:
ऑपरेशन द्रोणागिरीमुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात नवा अध्याय लिहिला जाईल. ड्रोनच्या साहाय्याने कृषी क्षेत्रात केवळ उत्पादनच वाढणार नाही, तर शेतकऱ्यांच्या श्रम आणि खर्चातही बचत होईल. शिवाय, आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाशिम जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख निर्माण होईल.आकांक्षीत जिल्हा असलेल्या वाशिममध्ये कृषी हा प्रमुख उदरनिर्वाहाचा स्रोत आहे. ऑपरेशन द्रोणागिरीच्या माध्यमातून ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे पीक उत्पादन, मातीचे संरक्षण, आणि पाणी व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल.
2. समाजाच्या उपजीविकेचा स्तर उंचावणे:
आकांक्षीत जिल्ह्यांमध्ये उपजीविका आणि कौशल्यविकासाला प्राधान्य दिले जाते. ऑपरेशन द्रोणागिरी अंतर्गत शेतकरी, युवक, आणि महिलांना जिओस्पेशियल तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण दिले जाईल, ज्यामुळे ते नव्या रोजगाराच्या संधींचा लाभ घेऊ शकतील.
3. स्थानिक समस्यांवर वैज्ञानिक उपाय:
आकांक्षीत जिल्ह्यांना विशिष्ट आव्हाने असतात, जसे की जलसंपत्तीचा अभाव, मृदा गुणधर्मांचे रक्षण, आणि पिकांवरील किडींचा प्रभाव. या समस्यांसाठी ड्रोनद्वारे अचूक डेटा गोळा करून उपाययोजना करण्यात येईल.
4. शासन धोरणांची अंमलबजावणी सुलभ करणे:
आकांक्षीत जिल्ह्यांमध्ये विकास प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञान आवश्यक आहे. जिओस्पेशियल तंत्रज्ञानामुळे जिल्हा प्रशासनाला योजनांची आखणी, अंमलबजावणी आणि परिणाम मोजणे अधिक सुलभ होईल.
वाशिम जिल्ह्याचा आकांक्षीत जिल्हा दर्जा आणि ऑपरेशन द्रोणागिरीचा भाग म्हणून मिळालेली संधी हा विकासासाठीचा संपूर्ण आराखडा आहे. ही योजना जिल्ह्याच्या शाश्वत प्रगतीसाठी एक गेम-चेंजर ठरू शकते. योग्य अंमलबजावणीसह, वाशिम आकांक्षीत जिल्ह्यांमधून प्रगत जिल्ह्यांमध्ये रूपांतरित होऊ शकतो. हा उपक्रम वाशिमसारख्या ग्रामीण भागांसाठी एक वरदान ठरू शकतो. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत, त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. या उपक्रमाचा यशस्वी अंमलबजावणीमुळे वाशिम जिल्हा केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशात एक आदर्श मॉडेल बनू शकेल.
“वाशिम जिल्ह्यासाठी ‘ऑपरेशन द्रोणागिरी’ हा खरोखरच ऐतिहासिक उपक्रम ठरणार आहे. निती आयोगाने वाशिम जिल्ह्याला आकांक्षीत जिल्हा म्हणून घोषित केल्यानंतर कृषी, आरोग्य, शिक्षण, आणि कौशल्यविकास या क्षेत्रांमध्ये आम्ही झपाट्याने प्रगतीसाठी प्रयत्नशील आहोत. या उपक्रमाद्वारे भू-स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्रात अधिक उत्पादनक्षमता आणणे, शेतकऱ्यांना अचूक माहिती उपलब्ध करून देणे, आणि पाण्याचे तसेच मातीचे संवर्धन करणे शक्य होणार आहे.
बॉक्स:
जिल्हाधिकारी वाशिम यांची प्रतिक्रिया:
‘ऑपरेशन द्रोणागिरी’मुळे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तांत्रिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वापरला जाईल. ड्रोनच्या माध्यमातून अचूक फवारणी, पिकांचे आरोग्य निरीक्षण, आणि कीड व रोग व्यवस्थापन करणे अधिक सुलभ होईल. याशिवाय, स्थानिक युवक आणि महिलांना जिओस्पेशियल तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळाल्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
आकांक्षीत जिल्हा म्हणून वाशिमच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत. ‘ऑपरेशन द्रोणागिरी’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक प्रशासन, शेतकरी संघटना, आणि औद्योगिक भागीदार यांच्यात समन्वय साधला जाईल. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी हा उपक्रम एक ‘गेम-चेंजर’ ठरेल, याचा आम्हाला विश्वास आहे.”
बुवनेश्वरी एस
जिल्हाधिकारी, वाशिम जिल्हा
_यासेरोद्दीन काझी
जिल्हा माहिती अधिकारी
वाशिम
Comments
Post a Comment