समाजाच्या तळागाळापर्यंत न्यायदानाची प्रक्रिया पोहचली पाहिजे


समाजाच्या तळागाळापर्यंत न्यायदानाची प्रक्रिया पोहचली पाहिजे

       पालक न्यायमूर्ती गोविंद सानप

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वैकल्पिक वाद निवारण केंद्र विधी सेवा सदन या नुतन इमारतीचे उत्साहात उद्घाटन

वाशिम,दि.४ जानेवारी (जिमाका): भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क व कर्तव्य प्रदान केले आहे. या मुलभूत हक्काची व कर्तव्याची जपणूक करण्यासाठी न्यायव्यवस्था सक्षम असणे गरजेचे आहे. सामान्य जनतेचा न्यायप्रणालीवर विश्वास असल्यामुळे समाजाच्या तळागाळापर्यंत
न्यायदानाची प्रक्रिया पोहचविण्यासाठी चांगले काम करा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश तथा वाशिम जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी केले.
      जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वैकल्पिक वाद निवारण केंद्र विधी सेवा सदन या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश शिरीषकुमार हांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विजयकुमार टेकवाणी, जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ऍड.अनूप बाकलीवाल, जिल्हा न्यायाधीश श्री.प्रधान यांची उपस्थिती होती.
      न्यायमूर्ती श्री. सानप बोलतांना पुढे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये विधी सेवा सदन हे प्रत्येक जिल्ह्यात असावे ही संकल्पना राबविण्यात आली. वाशिमची ही वास्तू २०२१ पासून तयार होती.काही तांत्रिक बाबींमुळे उद्घाटनास विलंबच झाला. त्याबद्दल त्यांनी दिलगीरी व्यक्त करत मनाचा मोठेपणा दाखविला. न्यायालयात येणाऱ्या सर्वांना विना विलंब सेवा मिळाव्यात अशी माफक अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.जनतेचा न्याय प्रणालीवर विश्वास आहे. जिल्हा न्यायाधीश आणि वकिलांनी हा विश्वास कायम राहण्यासाठी प्रयत्नशील राहावे. समाजातील गरीब, वंचित आदी घटकांना समान न्याय देण्याची प्रक्रिया न्यायालय करते. त्यामुळे सर्वांपर्यंत न्याय पोहचला पाहिजे. 'न्याय सब के लिए' या ब्रीद वाक्यानुसार न्यायाची प्रक्रिया आपल्याला समोर न्यायची आहे.असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
      प्रास्ताविक श्री.एस.व्ही हांडे यांनी केले.ते म्हणाले, न्यायालय हे एक मंदिर असल्याचे सांगून पक्षकार नमस्कार करून न्यायालयाच्या कक्षात प्रवेश करतात. त्यामागे आपल्याला येथे न्याय मिळेल हा त्याला विश्वास असतो. त्याचा हा विश्वास सार्थ होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे. सर्वांच्या समन्वयानेच हे शक्य होते. राष्ट्र सबळीकरणासाठी सर्वांनीच हातभार लावूया. त्यासाठी सेवाभाव जोपासूया असे त्यांनी सांगितले.
       सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते फित कापून व कोनशिलेचे आनावरण करून कार्यक्रमाची अत्यंत उत्साहात सुरुवात करण्यात आली.
      श्री बाकलीवाल म्हणाले, आपल्या न्यायप्रणालीतील सुधारणा प्रगती आणि आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नाची एक महत्त्वाची पाऊल आहे विधी सेवा प्राधिकरणाची स्थापना सामान्य लोकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी केली गेली आहे.गरीब वंचित आणि दुर्बल वर्गासाठी न्यायची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाची स्थापना झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
      संचालन ऍड प्रतिभा वैरागडे तर आभार सचिव श्री.टेकवाणी यांनी मानले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी लता फड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष जोशी, मुख्याधिकारी निलेश गायकवाड, कंत्राटदार , जिल्हा सत्र न्यायालयातील वकील, बार असोसिएशनचे पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी,नागरिक, जिल्ह्यातील जिल्हा विधिज्ञ संघाचे पदाधिकारी, लोक अभिरक्षक, विधी स्वयंसेवक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश